"वर्क फ्रॉम होम'मुळे लठ्ठपणा वाढला; व्यायाम शक्‍य नसल्याने आहारतज्ज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला

"वर्क फ्रॉम होम'मुळे लठ्ठपणा वाढला; व्यायाम शक्‍य नसल्याने आहारतज्ज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून "वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या नागरिकांना विविध व्याधींचा त्रास होऊ लागला आहे. शरीराची फारशी हालचाल होत नसल्याने बहुतांश लोकांकडून लठ्ठपणाच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे आहारतज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शारीरिक हालचाल होत नसेल तर आहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जात आहे. 

नवी मुंबई, पनवेल, उरण आदी महामुंबईच्या भागात 60 टक्‍क्‍यांहून अधिक नोकरदार वर्ग वास्तव्यास आहे. लॉकडाऊनमुळे हा नोकरदार वर्ग गेले सहा महिने घरातच बसून आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर एक महिन्यापासून कार्यालये सुरू झाली आहेत; मात्र त्यावरही मर्यादा असल्याने बहुतांश लोक आजही घरातच बसून काम करत आहेत. त्यामुळे एकाच जागेवर बसून काम करणे, सकाळी कार्यालयात जाण्याची घाई नसल्याने आरामात उठणे, रात्री उशिरापर्यंत टीव्ही अथवा मोबाईलमध्ये वेळ घालवण्याची सवय लागल्याने अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. घरातच बसून काम करावे लागत असल्याने खाण्या-पिण्याच्या वेळा बदलल्या आहेत. अवेळी वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय लागल्याने पचन संस्थेशी संबंधित त्रास वाढत आहे. एकूणच जीवनशैली बदलल्यामुळे लठ्ठपणा वाढल्याच्या तक्रारी नवी मुंबईतील विविध आहारतज्ज्ञांकडे येत आहेत. अशा वेळी काय खावे आणि काय टाळावे, याबाबत आहारतज्ज्ञ नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून सल्ला देत आहेत. 

काय करावे... आणि काय टाळावे 
- भारतीय आयुर्वेदानुसार सकाळी कफची वेळ असते, दुपारी पित्ताची वेळ असते. त्यामुळे दुपारी पचन संस्थेची क्षमता चांगली असल्याने त्याच वेळेत आपण खायला हवे आहे. नंतर शरीरात संध्याकाळनंतर हळूहळू वात वाढू लागतो. त्यामुळे संध्याकाळी लवकर आहार घेणे योग्य असते. 
- आहारात कर्बोदके आणि प्रथिने असणारे पदार्थ उदा. मांसाहार, भात, मिठाई, पोळी हे पदार्थ टाळावेत. त्याऐवजी फायबर असणारे म्हणजे मोड आलेले कडधान्य, फळांचा रस, सलाद यांचा आहारात समावेश करावा. 
- तेलकट पदार्थ, चहा-बिस्किटांचे प्रमाण वाढल्याने शरीरात चरबी वाढायला सुरुवात होते. त्याऐवजी लोह आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खावेत. 
- सकाळी नाश्‍त्यामध्ये मोड आलेले कडधान्य खायला हवेत, नंतर दुपारी जेवताना साधा आहार घ्यावा, पॉलीश न केलेला लाल भात अथवा डाळींचा आहार घ्यावा. सलादसोबत पोळी किवा भात खावा. भातासोबत पोळी खाऊ नये. 
- शक्‍यतो रात्री 8 च्या पूर्वीच जेवण करावे आणि रात्री 10 वाजता झोपावे. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत शांत झोप घ्यायला हवी आहे. 
 

लॉकडाऊनमुळे अनेक व्यक्तींकडून वजन वाढणे, लठ्ठपणा आणि स्थूलतेबाबत तक्रारी येत आहेत. सुदृढ शरीरासाठी आहार 80 टक्के आणि 20 टक्के व्यायाम असे सूत्र आहे. आहार आणि व्यायाम योग्य प्रमाणात केल्यास तुमचे आरोग्य सुदृढ राहील. 
- भवानी स्वामिनाथन,
आहारतज्ज्ञ, फाऊंडेशन ऑफ आकांक्षा डिझायर फॉर वेलनेस.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com