29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, कोरोना काळात 'सीव्हीडी' आणि न्यूमोनियामुळे सर्वाधिक मृत्यू

भाग्यश्री भुवड
Tuesday, 29 September 2020

29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 'सीव्हीडी' चा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा, हा यावर्षी ‘जागतिक हृदय दिना’चा संदेश आहे.

मुंबई: 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 'सीव्हीडी' चा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा, हा यावर्षी ‘जागतिक हृदय दिना’चा संदेश आहे. त्याविषयी जागरूकता वाढवणे अधिक महत्त्वाचे. आपल्यापैकी अनेकजण हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार (सीव्हीडी) आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांबद्दल समाजात जागरूक नाहीत. हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि उच्च रक्तदाबामुळे या आजाराची जोखीम वाढते.

ताणतणाव, चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैली यांच्यामुळे आज समाजात हृदयविकाराची समस्या झपाट्याने वाढत चालली आहे. आजारातून बरे होण्यासाठी रुग्णाला काही माहिती देणे ही प्राथमिक अवस्था असली, तरी चुकीची माहिती देणे किंवा अनावश्यक माहिती फार मोठ्या प्रमाणावर देण्यातून रुग्णाचे नुकसानच अधिक होऊ शकते. विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, कोरोनाच्या साथीच्या निमित्ताने, कोणती औषधे घ्यावीत, रोग कसा टाळावा, त्याची लक्षणे अशा माहितीची देवाण-घेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. अशा प्रसंगी, हृदयविकाराची खरी लक्षणे ओळखणे, उच्च रक्तदाबाचा धोका कोणता आणि त्यामध्ये कोरोनाचा संबंध कसा येतो, याविषयी खरी माहिती रुग्णांना मिळणे आवश्यक आहे.

डॉ. राहुल गुप्ता, सल्लागार, इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई

हृदयविकाराच्या गंभीर रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ

कोरोनाच्या संकटकाळात, हृदयविकार गंभीर झालेल्या रुग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे या रुग्णांनी नियमित तपासण्या करण्याचे टाळले असल्यानं त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत वाढलेली दिसते. त्याचप्रमाणे, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमधील पाचपैकी एका रुग्णाला हृदयरोगाची समस्या जाणवत असल्याचेही आढळले आहे. कोरोनामुळे केवळ श्वसनसंस्था आणि फुफ्फुस यांच्यावरच परिणाम होतो असे नाही, तर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीची यंत्रणाही खालावते. कोविडच्या रुग्णांमध्ये न्यूमोनियामुळे सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. त्याचबरोबर, अशा रुग्णांमध्ये ‘सीव्हीडी’मुळेही मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच, अशी जोखीम असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी रूग्णांच्या ह्रदयाची स्थितीची तपासणी करणे आणि त्यांचे परीक्षण करणे गरजेचे आहे. 

हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे का?

हृदयरोगाचं प्रमाण एकूणच भारतामध्ये, मुंबईसारख्या महानगरांमध्ये वेगाने वाढत आहे. कर्करोग, संसर्गजन्य आजारांइतकंच हृदयरोगाचं प्रमाणही झपाट्याने वाढलं आहे. या मागील महत्त्वाची कारणंही समजून घेण्याची गरज आहे. ही वाढ अचानक झालेली नाही. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सातत्याने बाहेरचे पदार्थ खाण्यामुळेही हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे. या आजारांतील गुंतागुंतही पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे हृदयविकारांचं बदलतं स्वरूप लक्षात घ्यायला हवं.

कोरोना विषाणूमुळे रक्तवहिन्यांसंबंधीचा वाढता धोका

उच्च रक्तदाबामध्ये धमनीच्या आतील भिंतींवर रक्ताचा दाब खूप जास्त प्रमाणात असतो. त्याकडे दुर्लक्ष झाले आणि योग्य प्रकारे उपचार केले नाही, तर मेंदूला कमी रक्तपुरवठा, रक्तवाहिन्यांचे आकुंचन, हृदय बंद पडणे, हृदयाची स्पंदने अनियमित होणे आणि इतर रक्तवहिन्यांसंबंधीचा आजार यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, दुहेरी दृष्टी, थकवा, छातीत दुखणे, हृदयाची अनियमित स्पंदने, नाकातून वारंवार रक्त येणे. चक्कर येणे, पाय दुखणे, मूत्रातून रक्त येणे, श्वास लागणे आणि मूर्च्छित होणे अशी सामान्य लक्षणे यामध्ये आढळतात. योग्य प्रकारे उपचार करणे आणि रक्तदाब सामान्य पातळीत राखणे यातून हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीची गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. कोरोनाच्या विषाणूमुळेही हृदयविकाराची गुंतागुंत वाढते, त्यामुळे ह्रदयाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हृदयविकार रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

या परिस्थितीत, हृदयविकाराची लक्षणे दिसल्यास, त्याची तपासणी करणे आणि सावधगिरीच्या उपायांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. ज्या रुग्णांना आधीच हृदयविकाराची समस्या भेडसावत आहे, त्यांनी कोणत्याही बिघडलेल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नये आणि गंभीर वैद्यकीय गुंतागुंत टाळण्यासाठी नियमितपणे उपचार घेणे चालू ठेवावे. या व्यतिरिक्त, पोषक आहार आणि व्यायाम यांमध्ये संतुलन साधून निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे. 

पौष्टिक आहार घेणे, मीठ आणि साखरेचे सेवन कमी करणे, जास्त जेवण टाळणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे आणि दररोज अर्धा ते एक तास व्यायाम करणे यातून उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करता येतो आणि हृदय निरोगी ठेवता येते. या खबरदारीमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, जी इतर रोग आणि विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी फायदेशीर ठरेल. सध्याच्या अभूतपूर्व काळात, निरोगी जीवनशैली, नियमित तपासणी आणि औषधोपचार, योग्य मार्गाने जागरूकतेमध्ये वाढ आणि वैद्यकीय व्यावसायिकांशी सल्लामसलत केल्यानंतर योग्य आहार घेणे या पद्धतीने ‘सीव्हीडी’चे व्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल आणि धोकादायक परिस्थिती टाळण्यास मदत होईल.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

World Heart Day highest death toll from CVD and pneumonia during corona period


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Heart Day highest death toll from CVD and pneumonia during corona period