'तुम्ही खासदार आहात; बोलताना भान ठेवणं अपेक्षित आहे'; संजय राऊतांना न्यायालयाचा सल्ला

सुनिता महामुणकर
Tuesday, 29 September 2020

अभिनेत्री कंगना रानौतने बीएमसीने केलेल्या पाडकामाविरोधात उच्च न्यायालयात दावा ठोकला होता. त्याप्रकरणी आज खासदार संजय राऊत आणि बीएमसीने आपली बाजू न्यायालया समोर मांडली. त्यावर न्यायालयाने आपले मत मांडत पुढील सुनावणी 5 ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगितले आहे

मुंबई - अभिनेत्री कंगना रानौतने बीएमसीने केलेल्या पाडकामाविरोधात उच्च न्यायालयात दावा ठोकला होता. त्याप्रकरणी आज खासदार संजय राऊत आणि बीएमसीने आपली बाजू न्यायालया समोर मांडली. कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याचा आम्हीही समर्थन करत नाही असे मत न्यायालयाने मांडले. यासोबतच न्यायालयाने संजय राऊत यांनाही एक सल्ला दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 5 ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामधील सर्व ट्विट दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कंगनाला दिले होते. तसेच राऊत यांनी दिलेल्या एका मुलाखतीची DVD ही न्यायालयानं आता मागविली होती. दरम्यान, कारवाई वेगाने झाली असली तरी ती बेकायदेशीर नाही, असा दावा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आला. तर कारवाईमध्ये काहीतरी घोळ दिसतोय, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. आजची सुनावणी संपली आहे.पुढील सुनावणी 5 ऑक्टोबरला होणार आहे.

मुंबईत रक्ताचा पुन्हा तुटवडा! कोरोना काळामुळे दात्यांची माघार; रुग्णालयांसमोर संकट

कंगनाप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. राऊत यांनी आपली बाजू मांडतांना प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे की, कंगना प्रकरणाशी माझा संबाध नाही. मी तिला कधीही धमकावले नाही.  तिने मुंबईला पाकव्याप्त काश्मिर म्हटले होते, म्हणून मी त्याविरोधात तीव्र प्रतिक्रीया एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान दिली होती. बाकी बीएमसीच्या पाडकामाशी माझा संबध नाही. महाराष्ट्र - मुंबईच्या बाबत चुकीचे बोलणाऱ्यांचा मी समाचार घेतला. 

न्यायालयात मुंबई महानगरपालिकेनेही आपली बाजू मांडली. त्यांनी कंगनाच्या ऑफिसवर केलेली कारवाई योग्य असून, त्यासंबधी तिला तक्रार असल्यास तिने कनिष्ठ न्यायालयात आधी पुरावे द्यावे. बीएमसीने कोणतही सुडाची कारवाई केलेली नाही. कनिष्ठ न्यायालयात योग्य तो न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागावी. न्यायालयानेही ही याचिक रद्द करावी. याप्रकरणी वेळ घालवू नये असे बीएमसीने म्हटले आहे.

'सर्वसामान्यांच्या रेल्वे प्रवासाचा विचार करा'; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना 

दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने कंगना, बीएमसी आणि संजय राऊत यांना 5 ऑक्टोबर रोजी लेखी भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांच्या प्रतिज्ञापत्रावर बोलताना न्यायालयाने म्हटले की, तुम्ही खासदार आहात, लोकप्रतिनिधी आहात तुम्ही सार्वजनिक ठिकाणी भान ठेऊन बोलणे अपेक्षित  आहे. आपण सारेच महाराष्ट्राचे नागरिक आहोत...आणि त्याचा अभिमानही असायला हवा, पण उत्तर देताना भान ठेवायला हवे. संजय राऊतांनी केलेल्या What is law? या विधानावर न्यायालयाने सवाल विचारला असता त्यांच्या वकिलांनी ते भावनेच्या भरात बोलले असतील असा युक्तीवाद न्यायालयात केला आहे. याबाबतची पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You are an MP It is expected to be conscious while speaking Court advises Sanjay Raut