esakal | ऑनलाईन डेटिंगच्या प्रलोभनाने तरुणाची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन डेटिंगच्या प्रलोभनाने तरुणाची फसवणूक

ऑनलाईन डेटिंगचे प्रलोभन दाखवून एका टोळीने नेरूळ येथील तरुणाला तब्बल ३ लाख ७२ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या टोळीविरोधात नेरूळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

ऑनलाईन डेटिंगच्या प्रलोभनाने तरुणाची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ऑनलाईन डेटिंगचे प्रलोभन दाखवून एका टोळीने नेरूळ येथील तरुणाला तब्बल ३ लाख ७२ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या टोळीविरोधात नेरूळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

फसवणूक झालेला तरुण नेरुळ सेक्‍टर- १९ मध्ये राहण्यास असून, त्याचा खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. मागील मंगळवारी (२७ ऑगस्ट) प्रिया गुप्ता नामक महिलेने या तरुणाला फोन करून, त्यांची वेबसाईट ऑनलाईन डेटिंगचे काम करत असल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रिया गुप्ता हिने सुजीत डे नावाचे बॅंक खाते क्रमांक व इतर माहिती व्हॉट्‌सऍपवरून तरुणाला पाठवून दिली व ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी ९२० रुपये भरण्यास सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून, या तरुणाने गुगल पे वरून ९२० रुपये पाठवून दिले. त्यानंतर प्रियाने त्याला लॉगीन आयडीसाठी, मेंबर्सशिपसाठी, मेंबर्सशीप लायसन्ससाठी, लिगल डॉक्‍युमेंटसाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून मोठी रक्कम भरण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने या तरुणाने तब्बल ३ लाख ७२ हजाराची रोख रक्कम प्रिया गुप्ता या महिलेला पाठवून दिली. 

मात्र, त्यानंतरदेखील प्रिया गुप्ताकडून आणखी रक्कम पाठविण्यास सांगण्यात आल्याने या तरुणाला संशय आला. त्यामुळे त्याने प्रियाकडे आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यावर प्रियाने टाळाटाळ करून त्याला आणखी रक्कम पाठविण्यास सांगितल्याने आपली फसवणूक झाल्याचे या तरुणाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने नेरूळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

loading image
go to top