पोलिसाच्या हत्येप्रकरणी तरुणास जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

आरोपीवर दया दाखवणे चुकीचे असल्याचे न्यायालयाचे मत 

मुंबई : चार वर्षांपूर्वी खारमध्ये वाहतूक पोलिसावर बांबूने हल्ला करून त्याच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला शनिवारी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसावर हल्ला करून त्याची हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशा आरोपीवर दया दाखवता कामा नये, असे स्पष्ट मतही न्यायालयाने नोंदवले आहे. 

हेही महत्‍वाचे...दाढीमुळे कोरोनाचा धोका?
 

आरोपी अहमद मोहम्मद अली कुरेशी (23) याला न्यायालयाने वाहतूक पोलिस शहीद विलास शिंदे (52) यांच्या हत्येच्या आरोपात शुक्रवारी दोषी ठरवले होते. राज्य सरकारने शिंदे यांना शहीद हा दर्जा दिला आहे. शनिवारी अतिरिक्त सत्र न्या. किशोर जयस्वाल यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जबर मारहाण करून हत्या (भादंवि 302), सार्वजनिक ठिकाणी अशांतता निर्माण करणे, वाहतुकीचे नियम मोडणे, चोरी आदी आरोपांमध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. जन्मठेपेच्या शिक्षेसह न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. यापैकी 45 हजार रुपयांची रक्कम शिंदे यांच्या कुटुंबियांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

पोलिसावर हल्ला होण्याची घटना दुर्मिळातील दुर्मिळ किंवा अपवादात्मक नाही. त्यामुळे आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र नाही, परंतु सेवेत असलेल्या आणि कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर मारहाण करून त्याची हत्या आरोपीने केली आहे. त्यामुळे तो कठोर शिक्षेसाठी पात्र आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे. अशा आरोपीला जर सहानुभूती दाखवली, तर त्याबाबत समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो असेही न्यायालयाने म्हटले आहे. शिंदे यांच्या कुटुंबियांतील वारसाला अनुकंपा तत्त्वावरील योजनेनुसार सेवेत सामावून घेण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले. 

हेही महत्‍वाचे...मुंबईत जमावबंदीचे आदेश

अभियोग पक्षाच्या दाव्यानुसार चार वर्षांपूर्वी खार येथील एस. व्ही. रोड मार्गावर एक अल्पवयीन मुलगा विनाहेल्मेट दुचाकी चालवत होता. त्या वेळेस कर्तव्यावर असलेले शिंदे यांनी त्याला थांबवले आणि त्याच्या हेल्मेट आणि परवान्याची विचारणा केली; मात्र मुलाने त्याच्या भावाला, कुरेशीला मोबाईल केला. कुरेशी घटनास्थळी आला आणि त्याने शिंदे यांच्याबरोबर बाचाबाची करायला सुरुवात केली. या वेळी कुरेशीने बाजूला पडलेला बांबू उचलून शिंदे यांना मारहाण करायला सुरुवात केली. यातील एक घाव वर्मी बसल्याने त्यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. 

भावाविरोधातही खटला 
कुरेशीच्या भावाविरोधात लवकरच खटला दाखल करण्यात येणार आहे. घटना घडली त्या वेळेस तो अल्पवयीन असला, तरी आता सज्ञान झाल्यामुळे त्याच्याविरोधात सत्र न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे. यासाठीही बाल न्यायालयाने परवानगी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man sentenced to life in police murder