"कोव्हिड कट'कडे तरुणांचा कल; केस कापण्याच्या पद्धतीवरही कोरोनाची छाप; नागरिकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न 

मिलिंद तांबे
Wednesday, 12 August 2020

कोरोनाचा परिणाम सर्व स्तरांत पाहायला मिळत असून, आता केस कापण्याच्या पद्धतीवरही (हेअर कट) कोरोनाची छाप पडल्याचे दिसून येत आहे. यातही "कोव्हिड कट' मारण्याकडे तरुणांचा अधिक कल आहे.

मुंबई : कोरोनाचा परिणाम सर्व स्तरांत पाहायला मिळत असून, आता केस कापण्याच्या पद्धतीवरही (हेअर कट) कोरोनाची छाप पडल्याचे दिसून येत आहे. यातही "कोव्हिड कट' मारण्याकडे तरुणांचा अधिक कल आहे. कोरोनाबाबत लोकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी पीक्‍सी आर्ट सलूनने या केस कापण्याच्या नवीन पद्धती सुरू केल्या आहेत. 

वंचित बहुजन आघाडी आक्रमक, राज्य सरकारच्या विरोधात आज राज्यभर थाळीनाद आंदोलन

लॉकडाऊनमुळे तब्बल पाच महिन्यांनंतर मुंबईतील केशकर्तनालये हळूहळू उघडू लागली आहेत. केशकर्तनालयांमध्ये नागरिकांचा ओढा कमी असली तरी तरुण वेगवेगळ्या पद्धतीने आपले केस कापून घेत आहेत. केस कापण्याच्या पद्धतीमध्ये आता नवीन "कोव्हिड कट'ची भर पडली असून, हा कट मारण्याकडे तरुणांचा अधिक कल आहे. याशिवाय "गो कोरोना', "कोरोना कट', "कोरोना 19' अशा नवीन केस कापण्याच्या पद्धती आल्या असून, कोरोना विषाणूचे चित्र रेखाटण्याकडे देखील तरुणांचा अधिक कल आहे. गोकुळाष्टमीनिमित्त कोरोना विरोधातील दहीहंडीची प्रतिकृती कोरण्याचा कलही तरुणांमध्ये दिसून येत आहे. यामध्ये डोक्‍याच्या मागील बाजूचे केस यंत्राद्वारे बारीक केले जातात. त्यानंतर त्यावर कोविड 19, गो कोरोना, कोरोनाचे चित्र रेखाटले जाते. या केस कापण्याच्या पद्धतीसाठी साधारणत: एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. शिवाय यासाठीचे शुल्क देखील अधिक आहे. 

मोठी बातमी : वाढीव वीज बिलांबाबत आज 'मोठा' निर्णय होण्याची शक्यता, वीज बिल होणार माफ ?

कोरोनाविरोधात लढण्याचा संदेश 
मुंबईत केशकर्तनालये उघडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र लोकांमध्ये भीती असल्याने ते केशकर्तनालयांकडे फिरकत नाहीत. सुरक्षेसाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. असे असले तरी लोकांच्या मनातील भीती काढण्याची गरज आहे. त्यामुळे गो कोरोना यांसारख्या केस कापण्याच्या नवीन पद्धती विकसित केल्या असून, त्यातून कोरोनाविरोधात लढण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पीक्‍सी आर्ट सलूनचे मालक विनोद कदम यांनी सांगितले. 

सध्या कोरोनाची दहशत सगळीकडे आहे. लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. अशात लोकांमधील भीती काढण्याची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याठी गो कोव्हिडचा हेअर कट करून घेतला आहे. 
- प्रणव सपकाळ, तरुण. 

वेगवेगळे सण, ऋतू, घटना यानुसार आता केस कापले जातात. गुरूपौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, गोकुळाष्टमी, होळी, नवीन वर्ष या सणांनुसार केस कापण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींना फार मागणी असते. त्यानुसार नवीन केस कापण्याच्या पद्धती विकसित करत आहोत. 
- विनोद कदम, मालक, पीक्‍सी आर्ट सलून.

-------------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young peoples tendency towards covid cut; coronas impression on hair cutting method; attempt to allay fears among citizens