मुंबईतील गर्दी नियोजनावर शून्य कृती; कार्यालयीन वेळा बदलण्याची मागणी 12 वर्षांपासून

कुलदीप घायवट
Friday, 29 January 2021

Mumbai local ने प्रवास करणाऱ्यांना कमी गर्दीचा सामना करावा लागावा, यासाठी गेली 12 वर्षे कार्यालयीन वेळा बदलण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे

मुंबई  : कोरोनाकाळात काही काळ बंद ठेवण्यात आलेली उपनगरी रेल्वेसेवा, काही अंतराने अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर विशिष्ट प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना या गाड्यांमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. आता 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांमधून प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. त्यात गर्दीचे नियोजन ही अट आहे; परंतु उपनगरी रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्यांना कमी गर्दीचा सामना करावा लागावा, यासाठी गेली 12 वर्षे कार्यालयीन वेळा बदलण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे; मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. 

मुंबई महानगरातील सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून वारंवार करण्यात आली आहे. तसे केल्यास गर्दीचे नियोजन होईल आणि उपनगरी गाड्यांवरील ताण कमी होईल, यावर विशेष भर देण्यात आला आहे. आता सर्वसामान्यांसाठी उपनगरी गाड्या सुरू करण्याची घोषणा झाली आहे. मात्र, हे करताना वेळेची अट अन्यायकारक असल्याची टीका नोकरदार प्रवाशांनी केली आहे. 
पहाटेची पहिली गाडी ते सकाळी 7 वाजेपर्यंत आणि दुपारी 12 ते दुपारी 4 पर्यंत प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे; तर रात्री 9 पासून शेवटच्या गाडीपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र खोपोली, कर्जत, कसारा, वसई, विरार येथून सीएसएमटी, चर्चगेट, पनवेलच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना या वेळांचा कोणताही लाभ होणार नाही. उपनगरातील नोकरदार प्रवाशांना यात विचारात घेण्यात आलेले नाही, या मुद्‌द्‌याकडे प्रवाशांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू केलीच आहे, तर गाड्यांच्या वेळाही बदलणे आवश्‍यक आहे, असे एका संघटनेने स्पष्ट केले. 

मुंबई. ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवासी बेदखल 
मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाव्यवस्थापकांना जुलै 2008 रोजी वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी 2015 रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मुंबई महानगरातील कार्यालयाच्या वेळा बदलणे, सुट्‌ट्‌यांचे नियोजन करण्याबाबत म्हणणे मांडले होते. या वेळी, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, 12 वर्षे सरूनही निर्णय झालेला नाही. एका अर्थाने सरकार आणि रेल्वेकडून प्रवासी बेदखल झाल्याची प्रतिक्रिया उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक मनोहर शेलार यांनी व्यक्त केली. 

( संपादन - तुषार सोनवणे )

-----------------------------------
Zero action on crowd planning in Mumbai Demand for change of office hours for 12 years

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zero action on crowd planning in Mumbai Demand for change of office hours for 12 years