धोरणे ठरवणारे प्रभावी झाले तर ‘जिजाऊं’च्या स्वप्नातील ‘स्वराज्य’ येईल : राजश्री पाटील

धोरणे ठरवणारे प्रभावी झाले तर ‘जिजाऊं’च्या स्वप्नातील ‘स्वराज्य’ येईल : राजश्री पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : राजमाता जिजाऊ, शहाजीराजे महाराज या दोघांनी मिळून ‘स्वराज्या’चे स्वप्न पाहिले होते. 'स्वराज्य' प्रत्येक जणमाणसाने उपभोगले पाहिजे, या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक कृती होती. त्या कृतीला जिजाऊंच्या संस्काराची जोड होती. आजही राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातले स्वराज्य, रयतेचे राज्य अमलात आणले गेले पाहिजे. आज मंत्रालयासारख्या ठिकाणाहूवन राबवण्यात येणारी धोरणे राज्यातल्या तळागाळापर्यंत जाऊन पोहोचली पाहिजेत. जेव्हा शेवटच्या माणसांसाठी धोरणांची अंमलबजावणी होईल तेव्हाच ‘जिजाऊं’च्या स्वप्नातील खऱ्या स्वराज्याची निर्मिती होईल, असे मत उद्योजिका, महिला अभ्यासक राजश्री पाटील यांनी केले.

जिजाऊ माँसाहेब जयंतीचे औचित्य साधून मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी जयंती उत्सव समितीच्या वतीने राजश्री पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजश्री पाटील बोलत होत्या, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव, तर प्रमुख उपस्थितीमध्ये सतीश इंगळे, जोंधळे पाटील, सरिता बांदेकर देशमुख, नीलेश जाधव यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यापूर्वी राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा इतिहास आम्ही पाहिला पाहिजे. जिजाऊ आणि शहाजीराजांना स्वराज्याचे स्वप्न पडले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गर्भामध्ये संस्कार झाले नसते. जिजाऊंची शिकवण, जिजाऊंचे संस्कार, जिजाऊंचा कर्तबगारपणा, जिजाऊने जागोजागी दाखवून दिलेला धाडसीपणा हे सगळे आपसूकपणे शिवाजी महाराजांमध्ये प्रत्येक कृतीमध्ये दिसते. त्याकाळच्या सगळ्या लढाया या सत्तेसाठी होत्या, त्यात कुठेही जातीय द्वेष नव्हता. आम्ही अलीकडच्या काळात त्या सगळ्या लढायांना जातीय रंग दिला. त्यामुळे महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य तरुणाईच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार करायला खूप वेळ लागला आहे. महाराजासारखे आम्ही का वागत नाही, महाराजांसारखे रयतेसाठीच स्वप्न आम्ही उराशी का बाळगत नाही. कारण आमच्यावर तसे संस्कार केले जात नाहीत. राजमाता जिजाऊंनी ते संस्कार केले म्हणून शिवाजी महाराज घडले, त्यांनी सर्वकाही रयतेसाठी हे स्वप्न उराशी बाळगले. आजची प्रत्येक महिला ‘जिजाऊ’च्या रूपाने पुढे आली पाहिजे, त्यांनी आपल्या मुलाला संस्कारित केले पाहिजे. लखोजीराव जाधव यांनी आपल्याला मुलगी व्हावी यासाठी नवस बोलला होता आणि त्यांना जिजाऊ झाल्या. आजकालच्या मुलींच्या रूपाने येणाऱ्या ‘जिजाऊ’ना गर्भाशयातच संपवले जाते, अशी खंत राजश्री पाटील यांनी व्यक्त केली. त्याकाळी प्रत्येक महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाठीकाठी, तलवार भाला चालवायला शिकायच्या. आता काळ बदललाय, पण तरीही महिलेला, मुलीला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण झालेच पाहिजे.

मंत्रालयामध्ये जिजाऊ माँसाहेब जयंती उत्सव समितीच्या वतीने स्त्री अभ्यासिका, उद्योजिका, समाजसेविका राजश्री पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले  होते. त्यावेळी बोलताना राजश्री पाटील.
मंत्रालयामध्ये जिजाऊ माँसाहेब जयंती उत्सव समितीच्या वतीने स्त्री अभ्यासिका, उद्योजिका, समाजसेविका राजश्री पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना राजश्री पाटील.

मंत्रालयात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठरवले तर, ‘जिजाऊं’चा विचार तळागाळातल्या त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. आम्ही राजमाता जिजाऊ ऐकल्या, अभ्यासल्या, आम्ही ‘जिजाऊं’ना कामांमधून पाहणे गरजेचे आहे, ती कृती ते काम मंत्रालयासारख्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे अमलात आणले जाऊ शकते.

जिजाऊ आणि अर्थकारण, जिजाऊ आणि शैक्षणिक धोरण, जिजाऊ आणि महिलांचे धोरण, जिजाऊ आणि संस्कारांचे लेणे, या अनेक विषयांवर राजश्री पाटील यांनी विस्तृतपणे आपले विचार मांडले, त्यांच्या भाषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

अंगावर काटा आला अन् संपूर्ण सभागृह एकदम शांत झाले...

खानाच्या भेटीचा दिवस उजाडला, त्या दिशेने राजे जाणार. त्याच दिवशी राजे छत्रपती शिवाजी महाराज माॅंसाहेबांचे दर्शन घ्यायला जातात. जेव्हा ते माॅंसाहेबांचे चरण पाहताच दोन पावले मागे येतात. त्यांच्या मनामध्ये शंका आली की, हे चरण आपल्याला उद्या स्पर्श करायला मिळणार आहेत का नाही? आपण वाचणार आहोत का नाही? आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर स्वराज्याचे काय होईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात काय चाललेय हे जिजाऊंनी हेरले आणि जिजाऊ त्यांना म्हणाल्या, “शिवबा, तुम्ही स्वराज्याची काळजी करू नका, तुमचे काही बरेवाईट झाले तर आम्ही संभाजीला घेऊन रयतेसाठीचा लढा पुढे लढत राहू”.

राजश्री पाटील यांनी अफजलखानाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग, जिजाऊ महाराजांचा संवाद सांगितला अन अंगावर काटा आला. सारे सभागृह एकदम शांत झाले.. किती धाडस आणि किती शूरपणा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com