बिलोली तालुक्यातील १८ गावे स्मशानभूमीविना; मरणानंतरही यातना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमी

बिलोली तालुक्यातील १८ गावे स्मशानभूमीविना; मरणानंतरही यातना

sakal_logo
By
विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : देशाच्या स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवाकडे वाटचाल चालू असताना बिलोली तालुक्यातील (Biloli) ७३ पैकी अठरा गावांत अद्यापही स्मशानभूमी (Cemetery) नसल्याची माहिती पुढे आली आहे. जिवंतपणी मरण यातना भोगणाऱ्या अनेक जीवजंतूप्रमाणे तालुक्यातील अठरा गावातील लोकांना मरणानंतरही दफन करण्यासाठी यातना भोगाव्या लागत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष घालून गाव तेथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी बिलोली तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (18 villages- in Biloli- taluka- without- cemeteries-Torture- even -after- death)

कवी सुरेश भटांच्या गझलेतील इतकेच मला जातांना सरणावर कळले होते जगण्याने केली सुटका मरणाने छळले होते. या ओळीप्रमाणे बिलोली तालुक्यातील अठरा गावातील लोकांना स्मशानभूमी अभावी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बिलोली तालुक्यातील हिंगणी नाग्यापूर, चिटमोगरा हुनगुंदा, कार्ला खुर्द, पोखर्णी, पाचपिंपळी, कुंभारगाव, हरनाळा, थडीसावळी, नागणी, ममदापूर, दुगाव, टाकळी खुर्द, गळेगाव बाभळी आणि जिगळा या गावांमध्ये सार्वजनिक स्मशानभूमी अद्यापपर्यंत अस्तित्वातच नाही. मरण पावलेल्या लोकांना दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक वेळेला वादाला वाचा फुटत असतात. कुंडलवाडी व बिलोलीसारख्या शहरी भागातही काही समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध नाहीत.

हेही वाचा -

बिलोली गटविकास अधिकारी कार्यालयाकडून स्मशानभूमी उपलब्ध नसलेल्या गावांची यादी न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली. आठ ते दहा वर्षांपूर्वीपासून या गावांमध्ये स्मशानभूमी मिळावी यासाठी वारंवार मागणी होत आहे. वीसपैकी केवळ दोन गावांमध्ये मागील दहा वर्षात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. उर्वरित अठरा गावे अद्यापही स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत आहेत.

स्मशानभूमीचा प्रश्‍न प्रत्येक गावासाठी महत्त्वाचा असतो. बहुसंख्य गावांमध्ये प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत मात्र त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली दिसून येत आहे. माणसाचा अंतिम प्रवास म्हणजे मृत्यू होय. आयुष्यभर जीवन जगल्यानंतर अंत्यविधीसाठी त्याला चांगल्या ठिकाणची जागा उपलब्ध झाल्यास जीवन सार्थकी लागले असे समजल्या जाते. मात्र बहुसंख्य ठिकाणी अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने मरणानंतरही माणसांना यातना सहन कराव्या लागत असतात. बिलोली तालुक्यातील अठरा गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी बिलोली तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top