
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
नांदेड : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेला व मांडवी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या पिडीत कुटुंबाला मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच आर्थीक मदत दिली.
महाराष्ट्र- तेलंगना सिमेवर असलेले व नांदेडपासून दोनशे किलोमिटर अंतरावर असलेल्या मांडवी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला संतोष माधवअप्पा मठपती (बक्कल नंबर 594) यांना ता. 28 सप्टेंबर 2020 रोजी विषाणू संसर्गाची लागण झाली. त्यांना नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल तपासणीनंतर कोरोना पॉझिटिव आला होता. याच उपचारादरम्यान एक ऑक्टोबर 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
हेही वाचा - सुदृढ नागरिकांनी नियमितपणे रक्तदान करावे- शैलेश कामत
कोरोना कालावधीत कर्तव्य बजावताना संसर्ग होऊन निधन झाल्याने ते कोरोना यौद्धे ठरले होते. यावरुन पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत पोलिस महासंचालक यांना सविस्तर अहवाल पाठविण्यात आला होता. संतोष मठपती (वय ३१) राहणार बडूर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड यांचा विषाणू संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना किंवा कायदेशीर वारसदार यांना विशेष अर्थसहाय्य कोवीड- १९ नुकसान भरपाई सानुग्रह अनुदान मंजूर झाले. सदरचे अनुदान 60 लाख रुपये असून दिवंगत कर्मचारी संतोष मठपती यांची पत्नी मनिषा मठपती व त्यांची मुलगी पर्वणी यांना चाळीस लाख रुपये तर माधव मठपती यांचे वडील व आई नागाबाई मठपती यांच्या नावे वीस लाख रुपये असे दोन स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र बिलोली नावाने धनादेश पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे, संतोष केंद्रे, शेख यांची उपस्थिती होती. कोरोना काळात त्यांनी सतत बीटमध्ये काम करत होते. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अतिशय धाडसाने त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावले. त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा धनादेश देऊन सन्मान केला. त्यांनी पोलिस खात्यात नऊ वर्षे अविरत सेवा बजावली होती. संतोष यांचे मुलीला भविष्यात शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत या विषयी जी काही अडचण असेल त्याबद्दल मदत करण्याचे तसेच पत्नीस अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्याचे अभिवचन पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी दिले.
त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच यापूर्वी मांडवी येथील अधिकारी व अंमलदार यांनी दिवंगत संतोष मठपती त्यांच्या कुटुंबांना 75 हजार रुपयांची मदत केली आहे. सन 2012 चे सर्व सहकाऱ्यांनी पाच लाख २० हजार ५५५ रुपये जमा केले. मुलगी पर्वणी हिच्या नावे एलआयसी पॉलिसी काढणार असल्याचे माहिती सांगण्यात आली आहे.