नांदेड शहरातील गरीबांच्या घरांसाठी तब्बल 70 कोटींचा निधी- अशोक चव्हाण

प्रल्हाद कांबळे
Saturday, 1 August 2020

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केला व त्यातूनच शहरातील गरीबांच्या घरासाठी तब्बल 70 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नांदेड : प्रत्येक गरीब व्यक्तीस स्वतःचे घर असावे असे एक स्वप्न असते. या स्वप्नाच्या परीपूर्तीसाठी नांदेड शहरात घरकुल योजनेची सुरूवात करण्यात आली. परंतु लॉकडाऊन व तत्पूर्वीच्या काही कारणांमुळे घरकुलाचे काम रखडले होते. परंतु यामध्ये विशेष लक्ष घालत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केला व त्यातूनच शहरातील गरीबांच्या घरासाठी तब्बल 70 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नांदेड शहरात सात हजार 331 कुटुंबियांना घर बांधकामासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक लाभार्थीस 40 हजार रूपये प्रमाणे 29. 43 कोटी निधी मनपास प्राप्त झाला होता. त्या निधीचे लाभार्थींना वितरणही करण्यात आले होते. परंतु पुढील निधी उपलब्ध न झाल्यामुळे घरकुलाचे काम निधीअभावी रखडले होते.

लॉकडाऊन व इतर काही कारणांमुळे हा निधी उपलब्ध होत नव्हता.

लॉकडाऊन व इतर काही कारणांमुळे हा निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे एक हजार 140 लाभार्थ्यांची अंदाजे 10 कोटी 50 लाख रकमेची देयके    डिसेंबर 2019 पासून प्रलंबित राहिली होती. दरम्यानच्या काळात राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले व अशोक चव्हाण यांच्यावर राज्याच्या बांधकाम खात्यासह जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली.

हेही वाचा -  यशस्वी भरारी : दहावी परीक्षेत अव्वल ठरलेली स्नेहल कांबळे काय सांगतेय तिच्या यशाची गोष्ट ? वाचा...

निधी म्हाडाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडे वर्ग केला

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गरीबांच्या हक्काच्या घरांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा जणू चंगच बांधला. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव    ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या काळातही आपल्या कार्यतत्परता दाखवत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित खात्याशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून पाठपुरावा केला. यासर्व बाबींचे फलित म्हणून नांदेड शहरातील गरीब माणसांच्या घरांसाठी तब्बल 70. 32 कोटी रुपये एवढा निधी म्हाडाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्या लाभार्थ्यांची देयके प्रलंबित आहेत त्या देयकांचे मनपाकडून वितरण होणार आहे. तर उर्वरित कामांसाठी हा निधी वापरल्या जाणार असून नांदेड शहरात राहणार्‍या गरीब माणसांच्या घरांचे स्वप्न पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 crore for poor houses in Nanded Ashok Chavan nanded news