मुदखेड येथील सीआरपीएफ केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन      

गंगाधर डांगे
Thursday, 28 January 2021

या कार्यक्रमास सीआरपीएफ चे डिप्टी कमांडंट कपिल बेनिवाल, सहाय्यक कमांडंट पुरुषोत्तम राजगडकर, जगन्नाथ उपाध्याय यांच्यासह केंद्रातील जवान, त्यांचे परिवार व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुदखेड ( जिल्हा नांदेड) : मुदखेड येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रामध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रातील मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सीआरपीएफ चे डिप्टी कमांडंट कपिल बेनिवाल, सहाय्यक कमांडंट पुरुषोत्तम राजगडकर, जगन्नाथ उपाध्याय यांच्यासह केंद्रातील जवान, त्यांचे परिवार व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुदखेड येथील केंद्रीय राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेल्या क्वार्टर गार्डमध्ये आज मोठ्या उत्साहात व थाटामाटात ध्वजारोहण करण्यात आले. अभिवादनानंतर (ता. २६) जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना ध्वजारोहनानंतर, केंद्रीय प्रशिक्षण संस्थेचे कमांडंट लीलाधर महाराणीया यांनी उपस्थित जवानांना शुभेच्छा दिल्या. राज्यघटनेचे महत्त्व सर्वांना माहिती करुन दिले आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशात सर्वाधिक पदके सीआरपीएफ या संस्थेला देऊन सन्मानित केल्याची माहिती दिली. यामध्ये कीर्ती चक्र चार, पीपीएमजी चार, पीएमजी ६८ अशी पदके सरकारने देऊन सीआरपीएफ संस्थेस सन्मानित केले असल्याची माहिती दिली.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, देशातील विविध राज्यांत तैनात असलेले पोलिस कर्मचारी आणि प्रजासत्ताक दिनी कीर्ती चक्र, पीपीएमजी, पीएमजी पदके प्रदान केलेल्या केंद्रीय अर्धसैनिक दलातील शूर अधिकारी आणि जवानांची नावे देखील यावेळी उपस्थितांना सांगितली

यासह, प्रशिक्षण संबंधित उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन २०२०- २१ या वर्षात या संस्थेत तैनात असलेले कमांडंट बी. वीर राजू, उप-कमांडंट कपिल बेनीवाल आणि उपनिरीक्षक जी. डी. नरखेडे दत्तात्रय यांना गृहमंत्री उत्कृष्ट प्रशिक्षण पदके प्रदान करण्यात आली असल्याची माहिती दिली व यांना पदक मिळवल्या बदल त्यांचा गौरवही केला.

ध्वजारोहणानंतर उपस्थित जवानांनी मानवंदना दिली मैदानावर विविध प्रकारच्या कवायतीचे प्रदर्शन करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व अधिकारी, अधीनस्थ अधिकारी, इतर सैनिक व प्रशिक्षणार्थी यांना मिठाई वाटप करण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72nd Republic Day at CRPF Central Training College, Mudkhed nanded news