स्वातंत्र्यदिनी ७८ शीख बांधव करणार आत्मदहन, कुठे ते वाचा

प्रल्हाद कांबळे
Friday, 14 August 2020

या व इतर मागण्यांसाठी ७८ शीख बांधवांनी स्वातंत्र्यदिनी शनिवारी (ता. १५) ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी

नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करून लोकशाही पद्धतीने नवीन अध्यक्ष निवडण्याचा अधिकार गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्यांना देण्यात यावा, या व इतर मागण्यांसाठी ७८ शीख बांधवांनी स्वातंत्र्यदिनी शनिवारी (ता. १५) ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना केली आहे. 

शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड गुरुद्वारा भक्तांचे श्रद्धास्थान असून देश-विदेशातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. यामध्ये राज्य शासन नियुक्त अध्यक्ष व गुरुद्वारा बोर्डाचे काही सदस्य अधिकारी आहेत. शासनाने नेमणूक केलेले अध्यक्ष व काही सदस्यांनी या संस्थेच्या उन्नतीकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. 

अनावश्यक १२० कोटी रुपयांच्या बांधकामाच्या निविदा मंजूर 

या संस्थेने मागील काही वर्षात परिश्रम घेऊन १७३ कोटींची रक्कम ठेवी स्वरूपात केली आहे. याच रकमेतून गुरुद्वारा बोर्डातील कोवीड लॉकडाऊन काळात विविध धार्मिक, आर्थिक देवाण- घेवाण करणे गरजेचे आहे. परंतु शासनाने नियुक्त केलेल्या अध्यक्ष व काही सदस्यांनी ता. १८ जुलै रोजी परस्पर गुरुद्वारा बोर्डाची बैठक घेऊन अनावश्यक १२० कोटी रुपयांच्या बांधकामाच्या निविदा मंजूर करून ठेवी स्वरूपाची रक्कम खर्च करून या संस्थेला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा चार दिवसांच्या रिमझिम पावसाने पाणीपातळीत वाढ, कुठे ते वाचा...

तसेच कलम ११ रद्द करावे

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करून नवीन अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने करून त्यासाठी सदस्यांना निवडीचा अधिकार द्यावा. तसेच कलम ११ रद्द करावे, १२० कोटी रुपयांच्या बांधकामाला स्थगिती द्यावी अन्यथा स्वातंत्र्यदिनी (ता. १५ ऑगस्ट) रोजी आम्ही सर्व ७८ शिख बांधव अनावश्यक बांधकाम रोखण्यासाठी आत्मदहन करणार असून आत्मदहनाची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

यांच्या आहेत निवेदनावर स्वाक्षऱ्या

या निवेदनावर देवेंद्रपालसिंग बुंगई, सरदार अमरप्रितसिंग, महेंद्रसिंग लांगरी, सरदार गुरुचरणसिंग,  ज्योतीसिंग कामठेकर, जगदीशसिंग नंबरदार, देवेंद्रसिंग बुंगई, सरदार सुरेंद्रपालसिंग, आकाश प्रतापसिंग यांच्यासह आदी ७८ शिख समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 78 Sikhs will set themselves on fire on Independence Day, read where nanded news