मरखेल परिसरात ९६ हजारांचा गुटख्यासह चारचाकी वाहन जप्त; दोघांना अटक

file photo
file photo

मरखेल (जिल्हा नांदेड) : कर्नाटक सीमेवरील मरखेल परिसर सध्या लॉकडाऊनच्या काळातही चर्चेत राहण्यासारखाच आहे. एरव्ही अवैध व्यापार- वाहतूकीसाठी प्रसिद्ध असलेल्या या परिसरात मरखेल पोलिसांनी केलेल्या कारवाईतुन लॉकडाऊन काळातही अवैध धंदे सुरूच असल्याचे सामोरे आले आहे. कर्नाटकातून नांदेडकडे जाणाऱ्या गुटख्याच्या चारचाकी वाहनासह त्यात असलेला ९६ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल मरखेल पोलिसांनी जप्त केला असून, चार लाखांचे वाहनही ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही रविवारी (ता. २८) रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मरखेल पोलिसांनी केली.

मरखेल परिसरातून केवळ हाकेच्या अंतरावर कर्नाटक राज्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. याठिकाणी गुटखा निर्मितीचे केंद्र जवळ असल्याने राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थ सहजतेने महाराष्ट्रात आणण्यासाठी मरखेल, मुक्रमाबाद या दोन पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मार्गाचा सर्रास वापर या अवैध व्यावसायिक लोकांकडून केला जातो. राज्यात गुटखा वाहतूक व विक्री याकरिता प्रतिबंध असतानादेखील सहजतेने गुटखा मिळत असल्याने नवल वाटल्यास गैर नाही. जिल्हा मुख्यालयावरुन प्रशासकीय गाडा हाकणाऱ्या अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी मात्र केवळ सामाजिक कार्यकर्ते किंवा स्थानिक पोलिस यांनी कारवाया केल्यावर कागदोपत्री व्यवहार पूर्ण करण्यासाठी पोचत असतात. या भागात बोटावर मोजण्याइतपत कारवाया या विभागाने केलेल्या नसल्याने या विभागाचे गुटखा माफियावर तिळमात्र वचक नाही.

सीमावर्ती औराद (कर्नाटक) येथून चारचाकी वाहन (एम. एच. ४३ एबी. २६४३) या वाहनातून प्रतिबंधित गुटखा नांदेडकडे जात असल्याच्या माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर, पोलिस विष्णूकांत चामलवाड, ग्यानोबा केंद्रे आदींनी (ता. २८) रोजी दुपारच्या सुमारास मरखेल बसस्थानकावर सदरचे वाहन अडविले. चौकशीत सदर वाहनात ९६ हजार ८०० रुपये किमतीचा विमल नावाचा पानमसाला व सुगंधित तंबाखू असल्याचे आढळून आला. उपरोक्त गुटख्यासह चार लाखांचे चारचाकी वाहन मिळून चार लाख ९६ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल मरखेल पोलिसांनी ताब्यात घेत मोहमंद फिरोज मोहमद युसुफ (रा. इतवारा, नांदेड) व मोहमद रफिक अब्दुल नबी (रा. मनियार गल्ली, इतवारा नांदेड) या दोघांना अटक केले आहे. गेल्या काही वर्षांत स्थानिक पोलिसांनी कारवाया करुन गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या असताना पुन्हा एकदा गुटखा विक्री व वाहतूक सक्रिय झाल्याचे या कार्यवाहितुन दिसून येत आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com