esakal | न्यायालयाच्या आदेशाने गोदावरी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

न्यायालयाच्या आदेशाने गोदावरी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कोरोनाची लागण झाल्यानंतर (Corona virus) काही ठिकाणी घरातील कमावती माणसेही सोडून जात आहेत. त्यांना सावरताना कुटुंबियांना काय आणि किती वेदना होत असतील? याची कल्पनाच न केलेली बरी. अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील कोरोना योद्धांच्या भरवशावर जीवाभावांच्या माणसांना वाचविण्यासाठी धडपड सुरुच आहे. मात्र, याच कोरोना योद्धांकडून सर्वसामान्यांची फसवणूक होत असेल तर त्याला काय म्हणायचे?. असाच एक प्रकार नांदेडच्या गोदावरी हॉस्पीटलमध्ये (Nanded Godawari hospital) सुरु असल्याचे उघडकीस आले असून, न्यायालयाच्या आदेशावरुन या रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ता. १८ मेच्या रात्री दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहरालगत असलेल्या मुजामपेठ धनेगाव येथील रहिवासी असलेले तसेच सातेगावच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले अंकलेश पवार यांना ता. १६ एप्रिल २०२१ रोजी कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी हिंगोली गेट परिसरात असलेल्या गोदावरी हॉस्पीटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना ता. २० एप्रिल रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ता. २१ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - पुणे महापालिकेचे नियोजन फसले! लस असूनही केंद्रावर आज शुकशुकाट

दरम्यान, गोदावरी हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी उपचाराच्या नावाखाली ३५ हजार रुपयाचे इंजेक्शन द्यावे लागणार, असे सांगितले. त्यावर रुग्णांच्या पत्नीने तीन दिवसाची मुदत मागितली. ती संपताच शुभांगी पवार यांनी ता. २४ एप्रिल रोजी ऑनलाइन ५० हजार रुपये व रोख ४० हजार रुपये असे एकुण ९० हजार रुपये सकाळी दहा ते अकराच्या सुमारास भरल्यानंतर डॉक्टरांनी बारा वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या प्रकरणात आपली फसवणुक झाल्याचे मयताची पत्नी शुभांगी पवार यांच्या लक्षात आले. मृत्यूनंतरही रुग्णालयाने पैसे घेतले व उपचार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेऊन कारवाईची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने घटनेची कागदपत्रांची व बिलांची पाहणी केली व हॉस्पीटलविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तीन दिवसापूर्वीच मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधीत रुग्णावर उपचार केल्याचे दाखवून तीन दिवसात एक लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरुन गोदावरी रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार श्री. रोडे करत आहेत.

हलगर्जीपणामुळे मृत्यू

स्कोर ७/२५ असा चांगला असताना देखील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अंकलेश पवार यांचा मृत्यू झाला. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे उपचाराचे दर न आकारता मनमानी दराने पैसे घेण्यात आले. रुग्णावर उपचार सुरु असल्याचे भासवून पीपीई किट, मेडीकल बिल, आयसीयू चार्जेस यासाठी देखील तीन दिवसाचे पैसे घेतले, असा युक्तीवाद फिर्यादीकडून केला असल्याची माहिती ॲड. शिवराज पाटील यांनी दिली.

संपादन- अभय कुळकजाईकर

loading image
go to top