esakal | अबचलनगर साहिब ऍक्ट 1956 मध्ये बदल करू नये- गुरूद्वारा बोर्डाच्या आजी- माजी सचिवांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या संदर्भात बुंगई-कामठेकर व अन्य सर्वांनी उपरोक्त सर्वांना तीन पानी सविस्तर निवेदन पाठवले आहे. तसेच पंचप्यारे यांनी सन 2014 मध्ये केलेल्या अशाच निवेदनाच्या दोन प्रतीदेखील दिल्या आहेत.

अबचलनगर साहिब ऍक्ट 1956 मध्ये बदल करू नये- गुरूद्वारा बोर्डाच्या आजी- माजी सचिवांची मागणी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड येथील सचखंड गुरूद्वाराशी संबंधित असलेल्या नांदेड शीख गुरूद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब ऍक्ट 1956 मध्ये कसलाही बदल करू नये, यासह अनेक मागण्या गुरूद्वाराचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई, माजी सचिव रणजितसिंघ कामठेकर यांच्यासह सुमारे 35 जणांनी मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्री यांच्यासह अनेकांकडे केल्या आहेत.

या संदर्भात बुंगई-कामठेकर व अन्य सर्वांनी उपरोक्त सर्वांना तीन पानी सविस्तर निवेदन पाठवले आहे. तसेच पंचप्यारे यांनी सन 2014 मध्ये केलेल्या अशाच निवेदनाच्या दोन प्रतीदेखील दिल्या आहेत.

ऍक्ट 1956 मध्ये बदल करू नये, तो ऍक्ट जसाच्या तसा ठेवावा, या ऍक्टच्या कलम 11 मधील दुरूस्ती रद्द करावी, ते कलम जैसे थे ठेवावे, बोर्डाच्या अध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे 17 सदस्यांवर सोपवावी, गुरूद्वारा बोर्डातील हजुरी खालसा दिवानचे 4 सदस्य, पंजाबातील 7 सदस्य जैसे थे ठेवावेत, त्या 11 जणांचे प्रतिनिधित्व कमी करू नये, त्याचप्रमाणे भाटिया समितीचा अहवाल स्थानिक शिखांना मान्य नसल्यामुळे तो अहवाल लागू करू नये, अशा अनेक मागण्या आजी-माजी सचिव व इतरांनी केल्या आहेत.

सचखंड गुरूद्वाराचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी ऍक्ट 1956 समर्थ आहे. त्यामुळे त्या ऍक्टमध्ये बदल करू नये, असा ठराव पंचप्यारे यांनी दि. 27 एप्रिल 2014 रोजी केला होता, याची निवेदनात आठवण करून दिली आहे. फडणवीस सरकारने कलम 11 मध्ये दुरूस्ती करून बोर्डाच्या अध्यक्षांची निवड करण्यास सुरूवात केली. त्याआधी बोर्डाचे 17 सदस्य मिळून अध्यक्षांची निवड करीत होते, तेव्हा राज्य सरकारने कलम 11 तील दुरूस्ती रद्द करावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

सचखंड गुरूद्वाराच्या ऍक्टमध्ये बदल करण्याची मागणी कोणीही केलेली नव्हती. भाटिया समितीचा अहवाल स्थानिक शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करीत नाही. त्यामुळे तो अहवाल निरूपयोगी आहे, असे मत निवेदनकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या कारणाने भाटिया अहवाल लागू करू नये, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री अशोक चव्हाण, महसूल व वन खात्याचे प्रधान सचिव आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना देण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर गुरूद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई, माजी सचिव रणजितसिंघ कामठेकर, सुरेंद्रसिंघ अजायबसिंघ, गुरूचरणसिंघ घडीसाज, भागींदरसिंघ घडीसाज, गुलाबसिंघ कंधारवाले, नौनिहालसिंघ जहागीरदार, देवेंद्रसिंघ मोटरावाले यांच्यासह 35 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

loading image