पदवीधर मतदारसंघ निवडणुक हालचालींना वेग; भाजपा मतदार नोंदणी अभियान 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 28 October 2020

भाजपाचे शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणी अभियानाची बैठक मंगळवारी खा.चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्यासह पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती.

नांदेड - मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुक प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरु होण्याची शक्यता गृहीत धरुन राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सतीश चव्हाण व भाजपाचे संभाव्य उमेदवार शिरीष बोरळकर यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. भाजपाचे शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणी अभियानाची बैठक मंगळवारी खा.चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्यासह पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी प्रमुख संभाव्य भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर हे गेल्या दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. खा.चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुखेड, कंधार, लोहा येथील भाजपा पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेवून मतदार नोंदणीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सोमवारी बोराळकर यांनी कंधार, लोहा, मुखेड तालुक्याचा दौरा करुन मंगळवारी नांदेड शहरात दाखल झाले.
भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगांवकर यांच्या निवासस्थानी जावून बोरळकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणूक रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा संघटन सचिव गंगाधर जोशी, जिल्हा सरचिटणीस डॉ.माधवराव उच्चेकर, भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, चैतन्यबापू देशमुख आदिंची उपस्थिती होती.

हेही वाचा नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन वाळू माफियांवर कारवाई करतात तेव्हा... -

खा.चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात

खा.चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मार्गदर्शन करताना बोराळकर म्हणाले, पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत पक्षाने जो उमेदवार देईल त्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षसंघटनेच्या पातळीवर मतदारांच्या गाठीभेटी घेवून पक्षाचे ध्येय धोरणे मतदारापर्यंत पोंहचविण्याची जबाबदारी भाजपा पदाधिकार्‍यांची आहे. हा मतदारसंघाची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे भाजपाच्या प्रत्येक पदाधिकार्‍यांनी स्वत: उमेदवार समजून मतदारापर्यंत पोंहचले पाहिजे. पक्षाच्या विचाराचे जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यास प्राधान्य दिल्यास भाजपाचा विजय हा निश्‍चित होईल असा दावा त्यांनी यावेळी केला.

यांची होती उपस्थिती

या बैठकीस भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करुन भाजपा उमेदवाराच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. मतदार नोंदणीसाठी भाजपाचा पदाधिकारी मतदारांच्या घरापर्यंत जावून कागदपत्राची जुळवाजुळव करुन मतदार यादीत त्यांचे नांव समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केली. या बैठकीस भाजपा जिल्हा संघटक गंगाधर जोशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.माधवराव उच्चेकर, जिल्हा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, भाजपा महानगर सरचिटणीस विजय गंभीरे, अ‍ॅड. दिलीप ठाकूर, प्रा.बालाजी गिरगांवकर, विद्यार्थी आघाडीचे प्रमुख अमोल पाटील यांच्यासह सर्व भाजपा आघाडींचे प्रमुख उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accelerating graduate constituency election movements; BJP voter registration campaign nanded news