अवैध वाळूसाठ्यावर कारवाई; ३०० ब्रास वाळू जप्त, नांदेडचे पोलिस व महसुल पथक कार्यरत

प्रल्हाद कांबळे
Thursday, 21 January 2021

नांदेड तालुक्यातील वांगी आणि नागापूर शिवारातील अवैध वाळू साठा (३०० ब्रास) जप्त केला. ही कारवाई पोलिस आणि महसुलच्या संयुक्त पथकांनी केली.

नांदेड : जिल्ह्यातील वाळू माफिया पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी कंबर कसली आहे. मकरसंक्रातीनंतर पुन्हा एकदा वाळू माफियांवर कारवाई केली. नांदेड तालुक्यातील वांगी आणि नागापूर शिवारातील अवैध वाळू साठा (३०० ब्रास) जप्त केला. ही कारवाई पोलिस आणि महसुलच्या संयुक्त पथकांनी केली. यावेळी एक ट्रक, जेसीबी जप्त करुन १६ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. महुसलची कारवाई म्हणजे तु कर रडल्यासारखे मी करतो मारल्यासारखे असल्याची बोलल्या जाते.

नांदेड तालुक्यातील वांगी व नागापूर शहरात अवैध साठवून ठेवलेल्या वाळूचा तीनशे ब्रास साठा जप्त केला. या वाळूची चोरी करुन उपसा करणाऱ्या तेरा शेतकऱ्यांसह तीन परप्रांतीयांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून शेतातील एक ट्रक व जेसीबी जप्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी कंबर कसली आहे. डाॅ विपीन यांना मिळालेल्या माहितीनुसार ते वाळूचा साठा पकडण्यासाठी बोंढार (ता. नांदेड) येथे पोहोचले. परंतु तेथे वाळूचा साठा आढळून आला नाही. जाताना नदीच्या दुसऱ्या बाजूने वांगी व नागापूर शिवारात वाळूसाठा दिसून आल्यामुळे त्यांनी पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकाला घटनास्थळी पाठविले. ट्रक (एमएच २६एडी४४२७) मध्ये परप्रांतीय मजूर श्री. चौधरी, हल्ला चधरी आणि अशोक यादव तिघे वाळू भरताना आढळले.

या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आणि जुन्या गावठाणात या परप्रांतीयांना तात्पुरते शेड बांधून राहण्यासाठी जागा दिली. त्यांना आश्रय देऊन त्यांच्याकडून नदीतील अवैध वाळूउपसा केला जात होता. आणि उपसा केलेली वाळू जवळच्या शेतात बेकायदेशीरपणे साठवली जात होती. याप्रकरणी या तिन्ही प्रकारांत संपतराव जाधव, काळबा प्रभू जाधव, गोविंदराव दत्ता जाधव, राजू जाधव, शिवाजी देविदास जाधव, रत्न लक्ष्मण जाधव, संभा केरबा जाधव सर्व राहणार वांगी, बालाजी संभाजी सपुरे, गजानन लालबा मस्के, दिगंबर रघुनाथ कर्डिले, कोंडीबा मुंजाजी कर्डिले, माधव मस्के, कचरु संभाजी हे सर्व राहणार नागापूर या १६ जणांविरुद्ध मंडळ अधिकारी खुशाल घुगे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात वाळू चोरी, पर्यावरण कायदा, महाराष्ट्र महसूल अधिनियम तसेच मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार किरण आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास फौजदार गोविंद खैरे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against illegal sand stockpile 300 brass sands seized, Nanded police and revenue squad working nanded news