esakal | संतापजनक घटनेनंतर मुदखेडच्या आस्था बालक आश्रमाला ठोकले सील

बोलून बातमी शोधा

file photo}

मुदखेड अनाथ बालीकेवर अत्याचार करणाऱ्या चार जणांना अटक, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..पण महिला व बाल संरक्षण समितीच्या कर्तव्यावर संशय ?

संतापजनक घटनेनंतर मुदखेडच्या आस्था बालक आश्रमाला ठोकले सील
sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड येथील येथील अनाथ बालक आश्रमात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुख्य आरोपीं मारोती गुंठेस अटक केल्यानंतर अन्य तीन आरोपींना देखील पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने अटक करण्यात आली आहे. 

आता या प्रकरणांमध्ये आरोपीची संख्या चार झाली असून मुदखेड पोलिसांनी झालेल्या घटनेस गांभीर्याने घेऊन काल या अनाथाश्रमास चालवणाऱ्या व आरोपीच्या घरातील अन्य तीन यात शिवाजी कोंडीबा गुंठे, आनंदा कोंडीबा गुंठे, पार्वती आनंदा गुंठे, शितल शिवाजी गुंठे यांना अटक करण्यात आली. यात तिघांना दोन दिवसाची पोलिस कस्टडी मिळाली आहे तर मुख्य आरोपी सात दिवसाची पोलिस कोठडीत आहे.

जिल्हा महिला व बाल हक्क समितीचे कार्य काय?

आस्था अनाथ बालकाश्रमातील अल्पवयीन अनाथ मुलींच्या अत्याचाराची ही मोठी घटना घडली असताना सुद्धा जिल्ह्यातील महिला व बालकांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला व बाल हक्क समितीचे योगदान काय..? असा सवाल आता जनतेतून समोर येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बाल संरक्षण हक्क विभाग कार्यान्वीत असून या विभागाचे काम ज्या- ज्या ठिकाणी बाल सुधारगृह, बाल अनाथ आश्रम असता त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला भेटी देऊन तेथील बालकांच्या काय समस्या आहेत या समजून घेऊन शासन दरबारी मांडायचे काम व त्यांच्यावर कोण कुठला अत्याचार तर होत नाही ना याची माहिती ठेवणे हे काम असताना नांदेड जिल्ह्यातील महिला व बाल संरक्षण समिती अशा असलेल्या अनाथ आश्रममध्ये आजपर्यंत जाऊन या बालकांची साधी काळजी घेण्याचा प्रयत्न केला नसल्याने अशा बाल हक्क व संरक्षण समित्या काय कामाच्या असा सवाल देखील आता जनतेतून उठत आहे. अनाथाश्रमातील अल्पवयीन मुलींवर होत असलेले प्रकार बाल संरक्षण समितीच्या समोर का येत नाहीत. राज्यातील बाल संरक्षण समिती कुचकामी ठरले की काय की, अशा कृत्यांना यांचा छुपा पाठिंबा मिळतो की काय याची चौकशी होणे आता गरजेचे आहे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

हा प्रकार घडल्यानंतर सदर जिल्हास्तरीय समितीने काय दिवे लावले याप्रकरणी कोणत्या उपाययोजना केल्या या चर्चेला मात्र आता उधान आले असून सदर बालकाश्रम हे प्रशासनाने सील केले असल्याचे समजते.

पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे आपल्या कल्पकतेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश शर्मा व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरु ठेवला आहे. यामध्ये घटनेचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू वटाणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक केशव पांचाळ, विनायक मठपती, बलवीरसिंग ठाकूर, रवी लोहाळे, मनोज राठोड, यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश आहे.

बालकाश्रमाची काळजी घेणे हे महिला व बालविकास विभागाचे काम

दरम्यान बाल विकासाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यालयाने याप्रकरणी काय उपाय योजना केल्या. संबंधित अनाथाश्रमात कितीदा भेटी दिल्या हा प्रश्न अनुत्तरीत असून याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसाकडून संबंधित विभागाला नोटीस बजावून आपले म्हणने सादर करण्यासाठी कळविण्यात येणार असल्याचे समजते. वास्तविक बालकाश्रमाची काळजी घेणे हे महिला व बालविकास विभागाचे आद्य कर्तव्य असले तरी संबंधित विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याचे खेदाने नागरिकांतून बोलल्या जात आहे. शासन नियमानुसार संबंधितांनी या बालकाश्रमास कितीदा भेटी दिल्या. चीमुकले बालक व मुली यांच्या सुरक्षिततेविषयी काय उपायोजना केल्या गेल्या हा प्रश्न तूर्तास अनुत्तरीत असला तरी मुदखेड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी तातडीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

वैद्यकीय तपासण्या होणे गरजेचे

देशभरामध्ये अल्पवयीन बालकांवर अत्याचाराच्या घटना खेळत असताना शासनाच्या वतीने चालविण्यात येणारे आस्था बालकाश्रमाप्रमाणे अनेक अनाथ आश्रम आहेत. या आश्रमामध्ये वास्तव्यास असलेल्या अनाथ अल्पवयीन बालकांच्या विशेष करुन मुलींच्या दर महिन्याला महिला व बाल संरक्षण समिती यांच्या माध्यमातून वैद्यकीय तपासण्या होणे गरजेचे असते. परंतु या तपासण्या होत नाहीत हे गंभीर असून अशा घटनांना एक प्रकारे बाल हक्क संरक्षण समितीच्या लोकांकडूनच मूक संमती मिळते की काय असा देखील प्रश्न अनुत्तरित आहे. अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने आतातरी शासनाच्या अखत्यारीत असलेल्या बालकाश्रम, बालसुधारगृह यामध्ये वास्तव्यास असलेल्या बालकांच्या वैद्यकीय तपासण्या वेळोवेळी कराव्यात व त्याची नोंद ठेवावी जेणेकरुन संस्थाचालकांवर अंकुश राहील व अशा घटना घडण्यास आळा बसेल.

संपादन- प्रल्हाद कांबळे