पुन्हा काका- पुतण्याचा वाद चव्हाट्यावर, काकाचा मावेजा उचलण्याचा पुतण्याचा डाव धुळीला

प्रल्हाद कांबळे
Sunday, 23 August 2020

बाहेरगावी असलेल्या काकाच्या नावे आलेला मावेजा उचलण्याचा प्रकार पुतण्याकडून होताना दिसुन आला. मात्र मावेजा वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने काकाचे एक लाख रुपये वाचले.

नांदेड : देगलुर तालुक्यातील मुक्रमाबाद येथील विस्थापीत लेंडी धरणग्रस्तांना त्यांच्या मालमत्तेचा मावेजा वाटप करण्याचे काम सुरू आहे. मात्र काका - पुतण्याचे नाते या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आले आहे. बाहेरगावी असलेल्या काकाच्या नावे आलेला मावेजा उचलण्याचा प्रकार पुतण्याकडून होताना दिसुन आला. मात्र मावेजा वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने काकाचे एक लाख रुपये वाचले. त्यांनी पुतण्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

परदेशात असलेल्या काकाच्या नावाने आलेला लेंडी धरणाचा मावेजा उचलण्यासाठी पुतण्याने नोटिशीला आपले आधार कार्ड आणि बॅंक खात्याची झेरॉक्स जोडली. परंतु मावेजा वाटप करणाऱ्यांनी पुतण्याचा हा डाव लगेच ओळखले. व त्याला तुरुंगाची हवा खायला भाग पाडले. ता. 19 ऑगस्ट रोजी मुक्रमाबाद येथे उघडकीस आली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या लेंडी धरणग्रस्तांच्या घरासाठी मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात मावेजा वाटप करणे सुरू आहे. जवळपास एक हजार ३१० घरमालकांना मावेजा वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना मावेजा चार्जर नोटिसा देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -  नांदेडला डॉक्टर - परिचारिकांमध्ये सुटीवरुन होतोय भेदभाव...

काकाच्या नोटीसीला जोडले आपले कागदपत्र

तिसऱ्या टप्प्यातील मुक्रमाबाद येथील वार्ड क्रमांक पाचमधील मावेजा वाटप करण्याचे काम ता.19 ऑगस्ट रोजी सुरू होतो. परदेशात राहत असलेल्या जावेद शेख यांच्या नावे 97 हजार 377 रुपयाचा मावेजा आला होता. त्यांना परदेशात असल्याने ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांच्या नावाने आलेली नोटीस त्यांचा पुतण्या शेख सादिक शेख याने आपले आधार कार्ड आणि बॅंक खात्याचा तपशील डोडून मावेजा उचलण्याचा प्रयत्न केला. नोटीसवर आलेले धरणग्रस्तांचे नाव आणि आधार कार्ड बँक खात्याचा तपशील यामध्ये तफावत आढळून आली.

मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा 

याबाबत लगेच मावेजा वाटप अधिकारी लक्ष्मण विठ्ठलराव टेकाळे यांनी त्याला विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी शेख सादीक याच्याविरुद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शेख साजिद शेख माजिद याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास शिवाजी वाडेकर करत आहेत.

स्वयंपाक येत नाही म्हणून विवाहितेचा छळ 

स्वयंपाक करता येत नाही तसेच माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याचा मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शहरातील साईप्रसादनगर येथे विवाहितेला सासरच्या मंडळीकडून स्वयंपाक येत नाही. माहेरच्या मंडळींनी लग्नात मानपान केला नाही. चारचाकी घेण्यासाठी  पाच लाख रुपये आणि सोन्याची चैन घेऊन ये म्हणून छळ केला. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार श्री. शिरसाट करीत आहेत.

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

तर दुसऱ्या घटनेत विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामनगर येथे विवाहितेच्या छळाची घटना घडली. दुकान टाकण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपयांची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ सासरच्या मंडळीनी सुरु केला.वेळ प्रसंगी तिला मारहाण करत असत. एवढेच नाही तर एक दिवशी तिच्याशी वाद घालून तिला घराबाहेर हाकलून दिले. पिडीतेच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्री. गायकवाड करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again, uncle-nephew's argument was on the table, nephew's instinct to pick up uncle's was washed away nanded news