कृषीकर्ज वाटपास मुहूर्त लागेना; तामसा सोसायटीतील प्रकार

तामसा सोसायटीतील अंदाजे सोळाशे सभासद शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत कृषीकर्जाची मागणी केली. पण सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेत याबाबत प्रत्यक्ष कर्जवाटप करण्यासाठी अद्यापही पावले उचलली जात नसल्यामुळे शेतकरी नाराज होत आहेत.
बँक कर्जासाठी शेतकऱ्यांची तारांबळ
बँक कर्जासाठी शेतकऱ्यांची तारांबळ

तामसा ( जिल्हा नांदेड ) : तामसा सेवाभावी सोसायटीमधील सभासद शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी कृषीकर्ज वाटप करण्यास मुहूर्त मिळत नसून शेतकरी सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेत विचारणा करण्यासाठी रोज खेटे घालत आहेत. शासनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मे महिन्यात कर्ज मागणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोसायटीमध्ये दाखल करून जून महिन्यात १४ टक्के वाढीप्रमाणे कृषीकर्ज वाटप करण्याच्या सूचना निर्गमित केले आहेत.

यानुसार तामसा सोसायटीतील अंदाजे सोळाशे सभासद शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत कृषीकर्जाची मागणी केली. पण सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेत याबाबत प्रत्यक्ष कर्जवाटप करण्यासाठी अद्यापही पावले उचलली जात नसल्यामुळे शेतकरी नाराज होत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषीकर्जाचा मोठा आधार मिळून व्यापाऱ्याकडून अव्वाच्या सव्वा दराने खाजगी कर्ज उचलणे टाळले जाते. पण पेरणीच्या तोंडावर अद्यापही शेतकऱ्यांनी मागणी करुनही कर्ज मिळत नसल्याने पुन्हा नाइलाजाने सावकाराकडे जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. येथील सेवा सोसायटीकडून बँक व सोसायटीबाबतची सर्व अपडेट माहिती सभासद शेतकऱ्यांना होण्यासाठी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. यावर शेतकरी कृषी कर्जाबाबत रोज विचारणा करीत आहेत. तालुक्यातील इतर मध्यवर्ती बँकेच्या शाखेअंतर्गत असणाऱ्या सोसायट्यांच्या सभासदांना कृषी कर्जाचे वाटप प्राधान्याने होत आहे.

कृषी कर्ज पेरणीच्या उपयोगी येणे आवश्यक असते. तामसा मध्यवर्ती बँकेची शाखा व्यवस्थापक हे बँकेअंतर्गतच्या १६ सेवा सोसायटीचे तपासणी अधिकारी आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच व्यक्ती कार्यरत असण्याचा फटका कर्जवाटपास बसत असल्याचे बोलले जाते. येथील परिस्थिती जिल्हा बँकेचे वरिष्ठ, लोकप्रतिनिधी, बँकेचे संचालक आदींना अवगत असूनही शेतकरी हितासाठी प्राधान्याने कर्जवाटप व्हावे म्हणून येथे अतिरिक्त कर्मचारी नेमणे आवश्यक आहे.

हेही वाचा - आपल्या काळ्या आईची सेवा करित कष्टाने अन्नधान्न पिकवतो. अशाच अर्धापुरातील शेतकरी कुटंबातील तरुणांनी नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.

याबाबत होणारी उदासिनता सभासद शेतकऱ्यावर अन्यायकारक ठरत आहे. सध्या येथील मध्यवर्ती बँकेतून गतवर्षीच्या नुकसानीचे अनुदान वाटप चालू असून वाटप पूर्ण होण्यास अजून पंधरवाडा लागू शकते. त्यामुळे शाखा व्यवस्थापक अनुदान वाटप कामी व्यस्त आहेत. तपासणी अधिकारी हेच शाखा व्यवस्थापक असल्याने कृषीकर्ज मागणीचे सोळा सोसायट्यांमध्ये अंदाजे पंचवीसशे शेतकऱ्यांच्या मागणी प्रस्तावाची तपासणी करून शिफारस केल्यानंतर कृषीकर्ज वाटपाला मुहूर्त मिळणार आहे. बँकेच्या वरिष्ठांनी येथे प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवून कृषीकर्ज प्रकरणे निकाली काढावीत,अशी मागणी सभासद शेतकऱ्यांतून होत आहे.

"सोसायटीकडे मे महिन्यात कृषीकर्जाच्या मागणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. पण अद्यापही कृषीकर्ज मिळाले नाही. पेरण्या संपल्यानंतर कृषीकर्ज मिळवण्याचा काय उपयोग. बँकेच्या वरिष्ठांनी स्थानिक अडचणींकडे लक्ष देऊन त्या सोडवायला पाहिजेत"-------रामसिंह बगेरिया ,सभासद शेतकरी, तामसा.

"चालू बाकीदार शेतकऱ्यांना १४ टक्के वाढ कृषीकर्जात मिळणार आहे. तामसा मध्यवर्ती बँकेत अपुरे मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे कृषीकर्ज वाटपास नाईलाजास्तव अन् दुर्देवाने विलंब होत आहे. अनुदान वाटप संपवून जुलै महिन्याच्या पंधरवड्यात हा प्रश्न प्राधान्याने निकाली काढला जाईल"-------किशनराव हुंडेकर, शाखा व्यवस्थापक तथा तपासणी अधिकारी, तामसा.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com