esakal | माहूरात पुन्हा एका बिबट्याचा विष प्रयोगाने मृत्यू; नांदेडमधील खळबळ उडविणारी घटना

बोलून बातमी शोधा

बिबट्या
माहूरात पुन्हा एका बिबट्याचा विष प्रयोगाने मृत्यू; नांदेडमधील खळबळ उडविणारी घटना (video)
sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : मागील दोन दिवसांपूर्वी (ता. २२) रोजी पहाटे एका बिबट्याचा मृतदेह माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथे गावा नजिक आढळून आला होता. त्या बिबट्यावर शेतकऱ्यांनी विष प्रयोग केल्याचे निष्पन्न झाले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी (ता. २३) रोजी सायंकाळी सात वाजता पुन्हा एका बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळ परिसरात दुर्गंध पसरल्याने संशयावरुन गावातील नागरिकांनी जाऊन पाहणी केली असता शेतातील मक्याच्या पिकात बिबट्याचा मृतदेह दिसून आला. पोलिस पाटील व अन्य नागरिकांनी या विषयी माहूर वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या घटनेमुळे संपूर्ण वन विभाग खडबडून जागे झाले आहे.

विशेष म्हणजे परवाच्या घटनेच्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर या बिबट्याचा मृतदेह होता. गुरुवारी (ता. २२) दिवसभर माहूर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून बसले असताना (ता. २३) शुक्रवार रोजी सहाय्यक वन संरक्षक शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन सुद्धा वन विभागाच्या नजरेत शुक्रवारी संध्याकाळी उशिरा दिसून पडलेल्या अन्य एका बिबट्याचा मृतदेह न पडल्याने आश्चर्य व्यक्त होत असून सलग दोन बिबट्यावर विषप्रयोग झाल्याचे घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथे एका मादी बिबट्यावर शेतकरी प्रकाश जगनलाल जैस्वाल (वय ५४) याने विष प्रयोग केल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने त्याला तीन दिवसाची शुक्रवार रोजी दुपारी वन कोठडी सुनावली होती. तेच त्याच दिवशी सायंकाळी दुसऱ्या बिबट्याचे शव सापडल्याने घटनेला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील तीव्रता लक्षात घेता नांदेड व नागपूर येथील वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी माहूर तालुक्यात हजेरी लावणे गरजेचे बनले आहे. कारण माहूर वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने येथील मौल्यवान वने व वन्य जीव धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या जंगलात सत्तत वणवा लागून आहे. (ता.२१, २२, २३) एप्रिल रोजी पुन्हा वणवा पेटला.

या पार्श्वभूमीवर माहूर वन विभागात मागील दोन वर्षात झालेली कामे, त्याचा दर्जा, फलनिष्पत्ती व वन आणि वन्य जीवांच्या बाबतीत सूक्ष्म चौकशी करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान आज त्याच शिवरात मृत आढळलेल्या बिबट्या ने ही ज्या गो-ह्यावर विषप्रयोग झाला होता त्याच गो-ह्याचा मास खाल्ला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. मच्छिंद्र पार्डी येथील सदन शेतकरी सोनुराम चव्हाण यांच्या शेतात मृत आढळलेला बिबट्या नर असून काल शेजारच्या शेतात आढळलेला बिबट्या मादी होता. त्या मुळे ही जोडी असावी व यांच्यासोबत यांच्या पिल्लांवर देखील विष प्रयोग होण्याची शक्यता घटनास्थळावर वर्तविली जात आहे. एकंदरीत या घटनेमुळे एक गोष्ट निश्चित झाली आहे की जंगलात लागलेल्या वणव्यामुळे प्राणी गावाच्या दिशेकडे कूच करत असून पाळीव जनावरांवर लक्ष असल्याने असे विषारी प्रयोग पशुपालक करत या घटनेची जबाबदारी निश्चित करून बनवा पेटण्याला तसेच माध्यमांमध्ये हिंस्र प्राणी गावाकडे मुक्त संचार करत असल्याच्या बातम्या आल्यानंतरही जन जनजागृती न करता नांदेड येथे राहून सेवा बजावणारे माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. पी. आडेसह सर्व संबंधित जबाबदार यांना निलंबित करुन त्यांच्याविरुद्ध चौकशी प्रस्तावित करण्याची मागणी जोर धरत आहे.

आरोपीला तीन दिवसाची वन कोठडी...!

माहूर तालुक्यातील मौजे मछिंद्र पार्डी शिवारातील मोतीराम जोधा राठोड यांच्या शेतात काल (ता. २२) एप्रिल रोजी पहाटे एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. वनविभागाने घटनास्थळावर भेट दिल्यानंतर अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्याने विनाविलंब तपासाची चक्रे गतिमान करुन संशयित आरोपीची विचारपूस करण्यासाठी त्याला काल दुपारीच घेतले होते. आरोपी शेतकरी प्रकाश जगनलाल जैस्वाल याने मंगळवार रोजी रात्री शेतातील गोठ्यात दोन बैल, एक गाई, व एक गोऱ्हा बांधून घरी आलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बुधवारला गो-ह्यावर हिस्त्र प्राण्याकडून हल्ला झाला असावा व पुन्हा इतर जनावरावर त्यांच्या कडून हल्ला होऊ नये म्हणून व सदर हल्ला कुत्र्याकडून झाला असावा असे समजून मृत गो-ह्यावर विषप्रयोग करून जुन्या कुजलेल्या असलेल्या विहिरीच्या खड्ड्यात गोरह्याचे मृतदेह फेकून दिले होते असा कबुली जवाब तपासात दिल्यानंतर गुरुवारीच त्याला ताब्यात घेऊन त्याचावर वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१, व भारतीय वन वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१)(i)नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तपासाधिकारी माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. पी. आडे, मिर साजीद आली, एम. बी. राठोड, वन रक्षक राजू कोटकर, एन. एम. मुरगुलवार, आर. पी. धोंडगे, राजू पोटकर हे करीत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे