अर्जापूरच्या युवकाचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायीच, कसा? ते वाचलेच पाहिजे  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

‘तुझी स्टोरी तर एखाद्या फिल्ममध्ये शोभेल अशी आहे, हे वाक्य डॉ. बालाजी भांगेच्या बाबतीत खरं ठरलं. त्याचं संघर्षमय जीवन ‘कॅनव्हास’ या शॉर्ट फिल्ममध्ये रेखाटलं गेलं. आणि त्या फिल्मला अनेक पारितोषिकेही मिळालीत.

नांदेड :  डॉ. बालाजीनं चित्रकलेची आवड लहानपणापासून जोपासली होती. त्यात पुढील शिक्षण घेत अनेक अडचणींवर मात करत फाईन आर्टसमध्ये त्यानं पीएचडी मिळवली. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त केले.  या धडपड्या आणि हरहुन्नरी कलाकार तरुणाच्या जीवनावर आधारीत ‘कॅनव्हास’ ही शॉर्ट फिल्म रविवारी (दि. पाच जुलै) एस.एस.व्हिजन या यु-ट्युब चॅनलवर रिलीज होत आहे. 

नांदेड जिल्ह्यातील अर्जापूर (ता.बिलोली) गावचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार डॉ. बालाजी भांगे हा तसा नांदेड जिल्ह्याला अपरिचितच ठरला आहे. जिल्ह्यामध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यानं थेट मुंबई गाठल्यानं त्याला गावाकडं फारसं ओळखत नाही. चित्रकलेत करिअर करायचं असं काही त्यानं सुरवातीला ठरवलं नव्हतं. खरं तर त्याला लष्करात जायचं होतं. एनसीसीच्या एका प्रशिक्षणादरम्यान त्याला कळलं की, ‘आर्ट’मध्ये चांगलं करिअर केलं की लष्करात चांगली पोस्ट मिळू शकते.

हेही वाचा - प्रेरणादायी ः स्वखर्चातून तयार केला रस्ता
 

त्यानंतर त्यानं पुढील शिक्षण ‘आर्ट’मधूनच घ्यायचं ठरवलं. त्यामुळे एनसीसी ट्रेनिंग हा डॉ. बालाजीच्या आय़ुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणावा लागेल. पुढे त्यानं मुंबई गाठून जे जे स्कुल ऑफ आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याला ‘फाईन आर्ट्स’ या विषयात डॉक्टरेट (पीएचडी) करायची होती. पण ती पूर्ण करण्यासाठी त्याला विद्यापीठ मिळत नव्हतं. या काळात बालाजी युथ फेस्टीवल पासून इतर अनेक  विद्यापीठांमध्ये फाईन आर्टस संबंधी ट्रेनिंग द्यायला जात असे. चंदिगडमधील प्रशिक्षणादरम्यान त्याची दिल्ली येथील एका प्रोफेसरशी ओळख झाली. ‘तुम्ही तुमचा रिसर्च आमच्या विद्यापीठात सबमिट करा’ असं त्या प्राध्यापकानं बालाजीला सुचवलं. आणि नवी दिल्लीतील विश्वकर्मा विद्यापीठातून बालाजीनं फाईन आर्टसमध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळवली.

हे देखील वाचलेच पाहिजे - सामाजीक भावनेतून वर्गमित्रांचा असाही सन्मान

डॉ. बालाजी भांगे याच्या खडतर जीवन प्रवासावर तयार झालेल्या ‘कॅनव्हास’ या शॉर्ट फिल्मला अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. या शॉर्ट फिल्मची भारताबाहेर होणाऱ्या एका स्पर्धेसाठी निवड सुद्धा झाली होती. परंतु, करोना महामारीमुळे ही स्पर्धाच रद्द करण्यात आली. डॉ. बालाजीचा जीवनप्रवास सगळ्यांना कळावा व लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी ही शॉर्ट फिल्म तयार केली असून, रविवारी  उद्या एस. एस. व्हिजन  या युट्युब चॅनलवर रिलीज होत आहे. निर्माते अभिनेते व दिगदर्शक हेमंत सुहास भालेकर यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. या फिल्ममध्ये डॉ. बालाजी भांगे याने स्वतःचीच भूमिका साकारली आहे.

येथे क्लिक कराच - परभणीत बाहेरगावाहून येताय; मग व्हावे लागणार होम क्वारंटाइन, अन्यथा...

साधारणपणे २००९ ते २०१० च्या दरम्यान एका दैनिकात माझ्या जीवनप्रवासावर एक बातमी प्रकाशित झाली होती. एका चित्रपटाला शोभेल अशी माझी जीवन कहाणी आहे, असा उल्लेख त्यात होता. पुढे युथ फेस्टिवल दरम्यान माझी दिग्दर्शक हेमंत भालेकर यांच्याशी ओळख झाली. माझ्या जीवन प्रवासावर शॉर्ट फिल्म करण्याचा विचार बोलून दाखवला होता.   
- डॉ. बालाजी भांगे, अर्जापूर, ता. बिलोली. जि. नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Arduous Journey Of The Youth Of Arjapur Is Inspiring Nanded News