धर्माबादमध्ये मोबाईलद्वारे मटका घेणाऱ्यास अटक; बुकीमालक व्यंकट सुरळीकर फरार

 सुरेश घाळे 
Wednesday, 10 February 2021

सूर्यकांत शिवराया तंबाखे (रा. गुजराथी कॉलनी) व व्यंकट सुरळीकर (रा. धर्माबाद) मटका घेणाऱ्या या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : मटका नावालाच बंद असून धर्माबाद शहरात मोबाईलद्वारे मटका तेजीत आहे. अनेक वेळा मटका घेणाऱ्या पंटरावर कारवाई केली जात आहे. " कारवाईनंतरही चालतोय आकड्यांचा खेळ " या मथळ्याखाली दैनिक ' सकाळ 'मध्ये सोमवारी (ता. आठ) बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन शहरातील बुरहान शहा चौक चिकन मार्केट कॉर्नरजवळ सोमवारी (ता. आठ) रात्री पावणेनऊ वाजता सूर्यकांत शिवराया तंबाखे (रा. गुजराथी कॉलनी) व व्यंकट सुरळीकर (रा. धर्माबाद) मटका घेणाऱ्या या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सूर्यकांत तंबाखे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून व्यंकट सुरळीकर हा फरार झाला आहे.

धर्माबाद शहरात ऑनलाइन लॉटरी, कल्याण- मुंबई मोबाईल मटक्यांचे क्रेझ वाढले आहे. सध्या ऑनलाइन लॉटरी, कल्याण- मुंबई, मिलन डे, श्रीदेवी, राजधानी अशा विविध प्रकारचा मटका हा देवीगल्ली, रेल्वेस्टेशन रोड, शंकरगंज, फुलेनगर, राहेरनाका, गांधीनगर, शिवाजीनगर, मोंढारोड, आंध्रा बसस्टँड, पानसरे चौक, बुरहानशाह चौक, रत्नाळी, बाळापूर आदी अनेक ठिकाणी बेकरी, पानशॉप, किराणा दुकान, चिकन दुकान, हॉटेलसह स्वतःच्या घरातही मटका चालवीत आहेत. 

मटका चालक व मटका खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पासून शहरात मटका चालत असून यावर लगाम लाण्यास असमर्थ असलेल्या धर्माबाद पोलिस ठाण्यामुळेच मटका जुगार तेजीत असल्याची ओरड आहे. अनेक वेळा मटका घेणाऱ्या पंटरावर कारवाई केली जात आहे. शहरातील बुरहान शहा चौक चिकन मार्केट कॉर्नर जवळ सूर्यकांत शिवराया तंबाखे हा कागदावर चिठ्या लिहलेल्या श्रीदेवी, माधुरी, राजधानी, कल्याण ओपन नावाचा मटका घेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून नगदी तीन हजार १७० रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाईल व मटका जुगाराचे साहित्य असा एकूण सात हजार १७० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सूर्यकांत तंबाखे यास ताब्यात घेतले असता मटका मालक व्यंकट सुरळीकर यांच्याकडे मोबाईलवर मटका देत असल्याचे सांगितले. मात्र व्यंकटराव सुरळीकर हा फरार झाला आहे. पोलिस अमलदार विश्वंबर शंकरअप्पा स्वामी यांनी ही कारवाई केली आहे. विश्वंबर स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for taking pot from mobile in Dharmabad; Bookie owner Venkat Surlikar absconding nanded news