Video : आर्थिक अडचणीच्या फेऱ्यात कलावंत, कसे? ते वाचाच  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. यामध्ये कलावंतांचाही सहभाग असून, आर्थिक मदत करावी असे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक मंत्र्यांना घातले आहे.

नांदेड : कोरोना या वैश्विक महामारीमुळे  समाजातील सर्वच घटकांच्या हाल-अपेष्टा होत आहेत. सर्वांनाच प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. आज राज्यभरातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलावंतांचे देखील बेहाल होत असून, त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅण्ड कल्चरल मुव्हमेंटच्या वतीने करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र राज्यात आज हजारो कलावंत सांस्कृतिक, सामाजिक आणि पारंपारिक कला सादर करून आपली उपजीविका करत आहेत. मात्र कोरोना या वैश्विक महामारीमुळे गेल्या तीन ते चार महिन्यापासून कलावंतांना कार्यक्रमच नसल्यामुळे जीवन जगावे कसे? असा भयावह प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.  या कलावंतांना कमाईचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने कला सादर करूनच आपली व कुटुंबियांचा उदरनिर्वाह करावा लागतो आहे. लॉकडाउनमुळे या कलावंतांची सध्या बेहाल होत आहेत. 

हेही वाचा - धक्कादायक : नांदेडचा ‘हा’ आमदार पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहचली ३४८ वर -

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
कलावंतांच्या समस्यांचा विचार करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची गरज आहे. कारण हे कलावंत आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत विषयांवरही प्रबोधन करत असून, त्याचा शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांनाही फायदाहोत आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्येही या कलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅण्ड कल्चरल मुव्हमेंटच्या वतीने संगीतकार प्रमोद गजभारे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन   इटनकर यांची भेट घेऊन केली.

या आहेत मागण्या

  • राज्यातील सर्वच कलावंतांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. 
  • रखडलेल्या मानधनाचा प्रश्न निकाली काढावा. 
  • महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेची पिढीजात जोपासना करणाऱ्या कलावंतांच्या आरोग्यासाठी विमा योजना सुरु करावी. 
  • महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी 

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
कलाकारांवर लॉकडाउनमुळे ओढवलेल्या संकटामुळे असंख्य प्रश्‍न उभे ठाकले आहे. त्यांचे प्रश्‍न तातडीने सोडवून आर्थिक मदत द्यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर प्रमोद गजभारे, विकास जोंधळे, रेखा मनाठकर, सिध्दोधन कदम, विकास कवठेकर, राहूल मोरे, बुध्दकिर्ती हुंडेकर, शाहीर रमेश गिरी, अनिल जमदाडे, धनंजय भुरे, रतन चित्ते, रमाकांत वावळे, संगीता राऊत,  हरबन्स कौर रामगडिया, संजय जगदंबे, संदीप वाघमारे, संजय भगत, अदित्य डावरे, दिपा बोंडलेवाड आदी कलावंतांच्या सह्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artist In A Round Of Financial Difficulties Nanded News