
आहो... हे स्थगिती सरकार आहे का...?
भोकर : महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही विविध लोकाभिमुख विकासकामांना कोट्यवधींचा निधी मंजूर केला. ते आताच्या सरकारच्या डोळ्यात खुपत आहे. आधीच्या सरकारपेक्षा आम्ही अधिक चांगले निर्णय घेणार आहोत, अशी वल्गना ते करीत आहेत. विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही कामे केली. हे सरकारने मात्र ऊठसूठ स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. हे स्थगिती सरकार असल्याचा समज वाढू लागला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
भोकर तालुका सरपंच संघटनेतर्फे बुधवारी तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांची बैठक झाली. तित ते बोलत होते. गोविंद शिंदे नागेलीकर, मंगाराणी अंबूलगेकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, गोविंद पाटील गौड, विनोद पाटील चिंचाळकर, नामदेव आयलवाड, भगवान दंडवे, माधव अमृतवाड आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, सरपंच संघटनेच्या बैठकीमुळे जनतेच्या समस्या एकाच ठिकाणी ऐकून घेता आल्या. शंभरटक्के मागण्या पूर्ण होत नाहीत पण अतिमहत्त्वाच्या मागण्या जरूर पुर्ण केल्या जातील. विकास कामात कधीच पक्षपातीपणा केला नाही. सरकार असो अथवा नसो, मतदारसंघात विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. भविष्यातही तीच भूमिका असेल. तालुक्यात नुकतीच अतिवृष्टी झाल्याने शेतीचे पन्नास टक्के नुकसान झाले आहे. काहींना जीव गमावला लागला. घराची पडझड झाली. जनावरे दगावली आहेत. स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठवीला आहे. जनावरे दगावली आहेत, अशांना मदत मिळाली नाही. ती मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
पसंतीचा उमेदवार असेल
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबईत बसून उमेदवार ठरविणार नाही तर तुम्हाला पसंत असलेल्याचा विचार होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
माझ्याविरुद्ध अफवांचा उद्योग
मी काँग्रेस पक्ष सोडणार आहे, अशा आशयाच्या अफवा काहींकडून पसरवल्या जात आहेत. तो त्यांचा उद्योग आहे, त्यांना तो करू द्या. त्यांच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही. मी अद्याप कसलाच निर्णय घेतला नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नये. जनतेने मला मोठे केले असून त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला जाणार नाही, असे पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले.
Web Title: Ashok Chavan Criticize Shinde Fadanvis Government Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..