esakal | तरुणावर प्राणघातक हल्ला; नांदेडच्या बारडध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दरम्यान या घटनेतील तीन आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडून पाच दिवसांचा कालावधी लोटला असतानाही आरोपीला अटक न करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

तरुणावर प्राणघातक हल्ला; नांदेडच्या बारडध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : फुले- शाहू- आंबेडकरी विचारांचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रात दलित बहुजनांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार थांबायचे नाव घेत नाही. शेतातील रस्त्याच्या कारणावरुन एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बारड (ता. मुदखेड) येथे घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बहुजन समाजामध्ये उमटले असून बारड पोलिसांनी गंभीर गुन्ह्याची नोंद न करता आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याने समस्त बहुजन समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेतील तीन आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडून पाच दिवसांचा कालावधी लोटला असतानाही आरोपीला अटक न करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

या खळबळजनक घटनेची हाती आलेली माहिती अशी की बारड येथील रहिवाशी असलेला कैलास शंकरराव पाणबुडे हा तरुण अल्पभूधारक शेतकरी आहे. याच्या शेतीलगत गंगाधर महादू माने, नागनाथ गंगाधर माने, शिवानंद गंगाधर माने यांची जमीन आहे. या तिघांनी जाणीवपूर्वक कैलासच्या शेताकडे जाणारा रस्ता बंद करुन टाकला. याची विचारणा केली असताना त्याला सतत दमदाटी व वारंवार त्रास देणे सुरु केले. रस्ता बंद करण्यात आल्याने त्याला शेताकडे जाणे अवघड होऊन बसले. दरम्यान ता. १६ जानेवारी रोजी कैलास हा आपल्या शेतात काम करत असताना गंगाधर महादू माने, नागनाथ गंगाधर माने, शिवानंद गंगाधर माने या तिघांनी त्याच्याशी पुन्हा वाद घातला. अर्वाच्च व जातीवाचक शिविगाळ केली. तो वारंवार विनंती करुनही आरोपी ऐकत नव्हते.

हेही वाचामहाआघाडीत बिघाडी नको म्हणून मला सध्यातरी...

याच दरम्यान त्याने शेताचा रस्ता खुला करा, अशी मागणी करीत असतानाच वरील तिघांनी वाद घालून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या पायावर कुऱ्हाडीचे सपासप वार केले. यात त्याचा एक पाय निकामी झाला. मारहाण करुन तीन आरोपी पसार झाले. दरम्यान जखमी कैलासला तातडीने नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी फिर्यादी कैलास शंकरराव पाणबुडे यांच्या फिर्यादीवरुन बारड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान घटना घडून आठवडाभराचा कालावधी लोटला असतानाही अद्याप कोणत्याच आरोपीला अटक करण्यात आली नाही. प्राणघातक हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला असतानाही बारड पोलिसांनी गंभीर गुन्ह्याची नोंद न करता आरोपींना वाचविण्यासाठी साध्या गुन्ह्याची नोंद केल्याने पोलिसांच्या या कृतीविषयी संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी समाजातील वरिष्ठांचे एक शिष्टमंडळ पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे.

आंदोलनाचा इशारा

कैलास पाणबुडे हा अल्पभूधारक शेतकरी परिस्थितीने अत्यंत गरीब असून शेतीवरच त्याची उपजिविका सुरु आहे. शेत शेजाऱ्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपीने कैलासचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असतानाही बारड पोलिसांनी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी या प्रकरणात ३०७ चा गुन्हा दाखल करावा व आरोपींना अटक करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रजासत्ताक पार्टी नांदेडच्या वतीने देण्यात आला आहे.