एटीएममधून पैसे पळविणारी एक टोळी लोहा शहरात सक्रिय 

बा. पू. गायखर 
Saturday, 10 October 2020

येथील शिक्षक ज्ञानोबा गोविंदराव घोडके (वय ५१) नंदिकेश्वर नगर, लोहा यांच्या बँक खातयातून ३३ हजार रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. सात) रोजी घडली. 

लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा तालुक्यातील एटीएममधून पैसे परस्पर लंपास करणारी टोळी लोहा शहरात सक्रिय झाली आहे की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. येथील शिक्षक ज्ञानोबा गोविंदराव घोडके (वय ५१) नंदिकेश्वर नगर, लोहा यांच्या बँक खातयातून ३३ हजार रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. सात) रोजी घडली. 

पोलिस सुत्रांकडून मिळलालेली माहिती अशी की, बुधवारी (ता. सात) शिवाजी चौक लोहा येथून एसबीआयचे एटीएममध्ये  पैसे काढण्यासाठी ज्ञानोबा घोडके गेले. यावेळी एटीएम मशिनवर भरपूर गर्दी होती. गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी व्यक्तीने श्री घोडके याच्या एटीएम कार्डची अधलाबदल करुन त्यांचा गुप्त कोड लक्षात ठेवून त्यांच्या हातावर त्याच रंगाचे कालीचरण के शर्मा या नावाची एटीएम (क्रमांक 4591150398087935) सुपूर्द केले. त्यानंतर अनोळखी व्यक्ती तेथून निघून गेला. त्या दरम्यान श्री. घोडके यांच्या खात्यातून पैसे काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलर धडकला. आपण एटीएम केंद्राच्या बाहेर असताना पैसे कोणी काढले. यामुळे त्यांना संशय आला. आपल्या जवळचे एटीएम कार्ड तपासले असता ते बनावट असल्याचे व दुसऱ्याचे असल्याचे समजले. तोपर्यंत दोन वेळेस प्रत्येकी १३ हजार आणि २० हजार असे त्यांच्या खात्यातून ३३ हजार रुपये काढून घेतले.   

हेही वाचा नांदेडहून मुंबईसाठी आता दररोज विशेष रेल्वे -

लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यानंतर ज्ञानोबा घोडके यांनी आपली बँक गाठली. घडलेला प्रकार व खात्यातून कपाच झालेली रक्कम याबद्दल त्यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारले.  तपासणी अंती ही रक्कम काढल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी लोहा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणी लोहा पोलिस ठाण्यामध्ये शनिवारी (ता. १०) गुन्हा नोंदविण्यात आला 
आहे.

एटीएम केंद्र रामभरोसे..!

लोहा शहरातील शिवाजी चौक, बस स्थानक परिसर त्याचबरोबर स्टेट बँकेच्या लगतचे परिसरात असलेले एटीएम केंद्र विनासुरक्षा रक्षक उघडे असतात. काही एटीएम केंद्रांना ग्लासची सुरक्षाही नाही. कॅमेरे कधी चालू तर कधी बंद असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. या परिसरात विजेचे दिवेही लागले नसल्यामुळे चोरटे नेमके ग्राहकांच्या संधीचा फायदा घेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलीस ठाण्याचे निरीक्षक भागवत जायभाये म्हणाले की संबंधित ग्राहकांची सलगी करून त्या कार्डावरील नंबर घेऊन परस्पर रक्कम उचलली असावी, या फसवाफसवीच्या टोळीचा शोध लावू. नागरिकांनीही नविन व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देऊ नये असे आवाहन केले. 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An ATM money laundering gang is active in Iron City nanded news