
मुदखेड शहरामध्ये मागील काही दिवसापासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना आता यात दरोड्याची भर पडली आहे.
मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेडच्या सराफा बाजारात शनिवारी (ता. ३१) सायंकाळी सात वाजता सराफा दुकान बंद करून आपल्या घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यास त्याच्याच दुकानाबाहेर दरोडेखोरांकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये संबंधित सराफा व्यापारी गंभीर जखमी झाला असून डोक्यात जबर मार लागल्याने व्यापार्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. मात्र लुटणारे चार दरोडेखोर हे फरार झाले आहेत.
मुदखेड शहरामध्ये मागील काही दिवसापासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना आता यात दरोड्याची भर पडली आहे. दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. व्यापारी व दरोडेखोरांच्या झटापटीत दरोडेखोरांच्या पिस्तुलातील कट्टा ( गोळया ) खाली गळून पडला त्यामुळे या दरोडे खोरांना गोळीबार करता आला नाही.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग पळवण्याचा प्रयत्न
मुदखेड येथील हरिओम ज्वेलर्सचे सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार यांच्यावर चार दरोडेखोरांनी हल्ला करुन त्यांच्या हातात असलेली सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. यात सदरील दरोडेखोर अयशस्वी झाले असून सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे व्यापारी तात्काळ पळत आले असता सदरील दरोडेखोरांनी तिथून पळ काढला.
हरीओम ज्वेलर्सचे व्यापारी राघवेंद्र पबितवार हे गंभीर जखमी
या दरोड्यामध्ये हरी ओम ज्वेलर्सचे व्यापारी राघवेंद्र पबितवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदरील घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना मिळतात पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूनील निकाळजे यांच्यासह आदी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. मुदखेड शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून परिसरात जागोजागी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पंधरा दिवसापूर्वीच असाच प्रकार घडला होता
मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी मुदखेड येथील सराफा व्यापारी भोकर येथील आपली सराफा दुकान बंद करून नेहमीप्रमाणे मुदखेडकडे येत असताना रिठा ते पांडुरना दरम्यान दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना लुटले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी (ता. ३१) मुदखेडच्या सराफा बाजारात सात ते आठ वाजताच्या सुमारास चार दरोडेखोरांनी सराफा व्यापार्यावर हल्ला करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुदखेडच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण पसरले. या घटनेमुळे बाजारपेठ ताबडतोब बंद झाली. पोलिस प्रशासनाने संबंधित दरोडेखोरांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी मुदखेड व्यापारी असोसिएशन, सराफा असोसिएशनसह इतर व्यापारी संघटनांनी मुदखेड पोलिसांकडे केली आहे.
व्यापाऱ्यांनी घाबरु नये
पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे, उपनिरिक्षक सुरेश भाले, पोलिस केशव पांचाळ, बलविर ठाकुर यांचेसह पोलिस जवानांनी सदरील घटनास्थळी जाऊन पाहणी करुन पंचनामा केला. गुन्हेगारांना लवकरच जेरबंद करु, व्यापाऱ्यांनी घाबरु नये, बाजारपेठेत अतिरिक्त बंदोबस्तात वाढ करुन सुरक्षा ठेऊ, पोलिस प्रशासन जनता व व्यापाऱ्यांसोबत असल्याचे पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी आवाहन केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे