कोरोना देणार का देगलूरकरांना धक्का?, नऊ अहवालांकडे लक्ष

file photo
file photo

देगलूर (जि.नांदेड) : भेंडेगाव बुद्रुक (ता. मुखेड) येथील युवक पत्नीसह मुंबईहून गावाकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आला होता. पण भेंडेगावच्या गावकऱ्यांनी त्यास प्रखर विरोध दर्शविताच त्याने सासऱ्याची सासरवाडी असलेल्या आमदापूर (ता. देगलूर)कडे त्याच रात्री धाव घेतली. येथे काही दिवस ‘गुपचूप’ राहिल्यानंतर गावकऱ्यांनी चर्चा करताच त्याने पुन्हा आपले मूळ गाव भेंडेगाव गाठले. काही दिवसांनंतर त्याला ताप येऊ लागल्याने त्याची बाऱ्हाळी रुग्णालयात तपासणी करून त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला.

या वेळी त्यांचा अहवाल रविवारी (ता. ३१) प्राप्त झाल्यानंतर त्याने वास्तव्य केलेल्या आमदापूर (ता. देगलूर) व त्याच्यासोबत सहप्रवासी राहिलेल्या अंतापूर (ता. देगलूर) येथे खळबळ उडाली, येथील आरोग्य यंत्रणेने तत्काळ प्रथम संपर्कात आलेल्या आमदापूर येथील पाच जणांना व अंतापूर येथील चार जणांना रविवारी (ता. ३१) येथील हैदराबाद रोडवरील आयटीआयमध्ये रात्री उशिरा क्वारंटाइन केले. सोमवारी (ता. एक) नऊ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून दोन दिवसांत त्यांचा अहवाल हाती येईल. त्यानंतर उपाययोजनाही केल्या जातील. सध्या तरी गावकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

(ता.१७ ते ता.२५) मे दरम्यान भेंडे गावचे ते जोडपे सासरवाडी असलेल्या आमदापूर येथे राहिल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सासू-सासरे व इतर तीन जण, अशा पाच जणांना व अंतापूर येथील चार जणांचा अहवाल काय येतो, यावरच तालुक्याचे भवितव्य अवलंबून आहे. या प्रवाशांची वाहतूक करणारा ऑटो चालक यंत्रणेच्या हाताशी सध्या तरी लागलेला नाही. यदा कदाचित या नऊ जणांपैकी एक जण जरी पॉझिटिव्ह आढळला, तर त्या चालकाला शोधण्याचे काम मात्र यंत्रणेला तत्काळ करावे लागेल. सध्या आमदापूर व अंतापूर या दोन्ही गावांत नागरिक सतर्क झाले असून ना बाहेरच्यांना आत येऊ देत आहेत, ना आतील नागरिकांना बाहेर जाऊ देत आहेत. या सर्व घटनाक्रमावर आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचेही लक्ष असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - लॉकडाउनचा असाही फायदा : बालविवाहाचा धडाका -

‘ग्रीन झोन’ अबाधित असले तरी धाकधूक कायम 
मरतोळी येथील एका वृद्ध महिला काही दिवसांपूर्वी पुण्याहून गावी येतानाच वाटेत मरण पावल्याने शंकाकुशंका घेण्यात आल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइनही करण्यात आले हाेते. मात्र, मृत महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यानंतर बेम्बरा येथील एका संशयिताचाही अहवाल निगेटिव्ह आला. कोराेना पॉझिटिव्ह असलेल्या मुखेड तालुक्यातील एका रुग्णांचा आमदापूर येथे सासरवाडीत राहिल्याने व सोबत अंतापूर येथील काहीजण त्याच्या सोबत प्रवास केल्याने आजपर्यंत ग्रीन झाेन राहिलेल्या देगलूर तालुक्याला यामुळे गालबोट लागते की काय, अशी शंका नागरिकांसह आरोग्य यंत्रणेलाही येत असल्याने त्यांच्या अहवालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

१५ हजारांच्या वर भूमिपुत्रांचे तालुक्यात आगमन 
पोटाची खळगी भरण्यासाठी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने गाव सोडलेल्यांनी (ता.२२) मार्च ते (ता.१६) मे दरम्यान ९३३५ नागरिक यांनी अधिकृतरीत्या आपापल्या गावात परतले. त्यातील बहुतेक जणांना क्वांरटाइनही करण्यात आले होते. लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात बहुतेकांनी आप आपल्या या गावाचा रस्ता धरल्याने अनधिकृतरीत्या व अधिकृतरीत्या प्रवेश केलेले तालुक्यातील पंधरा हजारांच्या वर भूमिपुत्र कोराेनाच्या भीतीने ‘गावकुसात’ आली, एवढे मात्र खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com