नांदेडमध्ये दररोज अडीच हजार शिवभोजन थाळींचे होते वाटप

प्रमोद चौधरी
Friday, 21 August 2020

नांदेड जिल्ह्यातील २२ शिवभोजन केंद्रांवर साडेतीन लाखांवर शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे लाॅकडाउनच्या काळात केवळ पाच रुपयांमध्ये ही थाळी दिली जात असून, दररोज अडीच हजार थाळींचे वाटप होत आहे.

नांदेड : राज्यातील गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात जेवण उपलब्ध व्हावे उद्देशाने राज्यात शिवभोजन योजना सुरु करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यात सद्या एकूण २२ शिवभोजन केंद्र कार्यरत असून प्रतिदिन दोन हजार ५०० शिवभोजन थाळींचे वाटप केले जाते.

गरीब आणि गरजु व्यक्तींसाठी स्वस्त दरात भोजन मिळावे यासाठी शासनाने २६ जानेवारी पासून १० रुपयात शिवभोजन ही योजना सुरु केली.लॉकडाउनच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याने तसेच हॉटेल्स बंद असल्याने हातावर पोट असलेल्यांसाठी केवळ पाच रुपयांमध्ये ही थाळी दिली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील २२ केंद्रावर आतापर्यंत तीन लाख ६१ हजार ७६७ शिवभोजन थाळींचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा - सचखंड गुरुद्वारा बोर्ड : सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना फटकारले, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम

११ ते तीनपर्यंत थाळीचे वाटप
शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक व ताजे भोजन देण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम सुरु केला आहे.  सुरुवातीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय परिसरातील, जिल्हा रुग्णालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात तसेच महानगरपालिका परिसरात भोजनालय सुरु करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण भागातही या योजनेची अमलबजावणी करण्यात आली. दररोज दुपारी ११ ते तीन वाजेपर्यंत गरजूंना शिवभोजन थाळींचे वाटप केले जात आहे.

हे देखील वाचाच - नांदेड जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; ११५ जण पाझिटिव्ह

जिल्ह्यामध्ये २२ केंद्र
जिल्ह्यात सध्या २२ शिवभोजन केंद्र सुरु आहेत. यापैकी जिल्हास्तरावर सात तर तालुकास्तरावर १५ केंद्र कार्यान्वित आहेत. या सर्व केंद्रामध्ये दररोज अडीच हजार थाळींचे वाटप केले जात आहे. २५ जानेवारी ते १५ आॅगस्ट २०२० या कालावधीत जिल्ह्यात २२ केंद्रावर एकूण तीन लाख ६१ हजार ७६७ थाळींचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाकूडन देण्यात आली आहे.

येथे क्लिक कराच - नांदेड जिह्यात फवारणीचा काळ अन जनजागृतीचा दुष्काळ

आता पाच रुपयात थाळी
दरम्यान कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे स्थलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी तसेच रस्त्यावरील बेघरांना लाॅकडाउनच्या काळात केवळ पाच रुपयांमध्ये शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पाच रुपयांमध्येच  थाळीचे वाटप केले जाणार आहे. यासाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच तोंडावर मास्कचा वापर करणे, भोजनालयाचे निर्जंतुकीकरण करणे आदी सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Basis Of Shivbhojan Plate For The Needy In Nanded