बहुपर्यायी परीक्षेसाठी व्हा तयार; ‘स्वारातीम’चे वेळापत्रक जाहीर

srtmun.jpeg
srtmun.jpeg


नवीन नांदेड ः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार; तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ व विद्यापरिषदेच्या निर्णयानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील व अंतिम सत्रातील जे विद्यार्थी मागील सत्रात काही विषयांत अनुत्तीर्ण असतील अशा सर्व विषयांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोविड-१९ परिस्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन; तसेच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सदर परीक्षा घेण्यात येणार आहेत. 


नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग 
यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन बहुपर्यायी परीक्षापद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रात काही विषयांत अनुत्तीर्ण असतील तर त्या विषयाची परीक्षा ता. तीन ते ता. २५ ऑक्टोबर यादरम्यान घेण्यात येणार आहेत. सर्व परीक्षांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र आजपर्यंत भरलेले नसल्यास त्यांनी ता. दहा सप्टेंबरपर्यंत आपापल्या महाविद्यालयामध्ये आवेदनपत्र सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षा दिली नाही, त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ता. १५ ते ता. २५ सप्टेंबर यादरम्यान संबंधित महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार आहे. 


गावाजवळच्या परीक्षा केंद्राची मागणी 
सर्व परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने व अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाइन पद्धतीने उत्तरपुस्तिकेद्वारे परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना घरी बसून देता येणार आहेत. ऑनलाइन परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास तेवढा कालावधी विद्यार्थ्यांना वाढून देण्यात येईल. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक तासाचा कालावधी देण्यात येणार आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने परीक्षा एकाच वेळेस सुरू होतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षापद्धतीने परीक्षा देणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल. जर परीक्षा केंद्र दूर असेल तर अशा विद्यार्थ्यांना गावाजवळच्या परीक्षा केंद्राची मागणी करता येईल. 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा 
परीक्षा केंद्र आणि परीक्षापद्धती बाबतीत ता. १५ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयांनी ई-मेलद्वारे अथवा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना बोलावून परीक्षा केंद्र, परीक्षापद्धती संमतीने निश्चित करावी, ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन, लॅपटॉप, संगणक, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आदींची व्यवस्था परीक्षार्थी विद्यार्थ्यांची राहील; तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता यावी, यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा महाविद्यालयांनी उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सोयीनुसार ऑनलाइन, ऑफलाइन किंवा ओपन बुकद्वारे परीक्षा देता येतील. सर्व परीक्षा रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशीही घेण्यात येणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी पद्धतीची असेल. त्यामध्ये ४० प्रश्न असतील, त्यासाठी ४० गुण असतील. प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येणार आहे. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असणार आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय असतील. पदव्युत्तर प्रश्नपत्रिका ही ४० गुणांची असेल व प्रश्नपत्रिकेमध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. या परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. 

या सूचना पाळणे बंधनकारक 
विद्यार्थ्यांनी पेपर सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त ३० मिनिटे उशिराने प्रवेश दिला जाईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर किमान तीस मिनिटांनंतर परीक्षा कक्ष सोडण्यास परवानगी देण्यात येईल. सदर परीक्षेची बैठक व्यवस्था ही कोविड-१९ ची नियमावली पाळून घेण्यात येणार आहे. कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवून, परीक्षेपूर्वी सर्व परीक्षा केंद्रातील दालनाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. ऑफलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी तोंडाला मास्क बांधणे, परीक्षा केंद्रावर सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com