अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया राजकारणात येणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chavan

अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया राजकारणात येणार?

वन्नाळी (जि. नांदेड) : राहुल गांधी यांच्या स्वागताचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी फलक लावले. या फलकांवर मुलगी श्रीजया यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्या चव्हाणांच्या राजकीय वारस म्हणून राजकारणात पदार्पण करणार असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली. चव्हाण यांनी सायंकाळी सूचक ट्विट करून त्याला अप्रत्यक्षरीत्या दुजोराही दिला. गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. पण, भारत जोडो यात्रेची तयारी, नियोजन आणि सहभागात त्यांचा सक्रिय पुढाकार आहे.

जिल्ह्यातील सगळे नियोजन चव्हाण यांनीच केले. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला. पण, आता त्यांच्या कन्या श्रीजया राजकारणात येणार अशी नवी चर्चा सुरू झाली. त्यांनी मंगळवारी पदयात्रेत सहभागही घेतला. त्यानंतर सायंकाळी चव्हाणांनी फेसबूक पोस्ट आणि ट्विट करून या नव्या चर्चेला हवा दिली. श्रीजया या चव्हाणांच्या राजकीय वारस असतील, असेही अप्रत्यक्षरीत्या चव्हाणांच्या या पोस्टचा अर्ध काढला जात आहे.

अशोकरावांचे शक्तीप्रदर्शन
यात्रेतून अशोक चव्हाणांनी एक प्रकारे शक्तिप्रदर्शन केले. नांदेड शहर व जिल्ह्यात जागोजागी त्यांनी मोठमोठे फलक लावले. यातून त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ऊर्जा मिळाली. शिवाय महाराष्ट्रात यात्रेचे झालेले उस्फूर्त स्वागत बघता यातून पक्षाला चव्हाणांचे महत्त्व आणि राज्यात असलेली पकड दिसून आली.