...तर निवडणुकांकडे दुर्लक्ष झाले असते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharat jodo Yatra Avoidance in Gujarat Himachal Elections would have been ignored Jairam Ramesh statement politics

...तर निवडणुकांकडे दुर्लक्ष झाले असते

नांदेड : ‘भारत जोडो’ यात्रा गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये गेली असती तर तेथील पक्ष संघटन यात्रेवर खर्ची पडले असते. निवडणुकीकडे दुर्लक्ष झाले असते. त्यामुळे या राज्यात यात्रा नेण्याचे टाळले, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. महाराष्ट्रातून फक्त पाच जिल्ह्यांतूनच ही यात्रा का जाते, अशी सातत्याने विचारणा होते. भौगोलिकदृष्ट्या आणि खासदार राहुल गांधी यांची सुरक्षा याचा विचार करता यात्रेचा हा मार्ग अंतिम केला. इतर मार्गाने निव्वळ पदयात्रा झाली नसती. उलट आम्हाला यात्रेतून जो संदेश द्यायचा आहे, तो नागपूरच्या कुंभकर्णाला देता आला असता तर, चांगलेच झाले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली. आधीच्या राज्यात पदयात्रेची सरासरी २० किलोमीटर होती ती महाराष्ट्रात २४ झाली आहे. यात्रेनिमित्त देशात जेवढे जायला पाहिजे होते, तेवढे जाता आले नाही. गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये इच्छा असून जाता येत नाही, अशी खंत जयराम रमेश यांनी व्यक्त केली.

पवारांच्या प्रकृतीची विचारपूस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार होते. पण प्रकृतीच्या कारणास्तव ते येऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यावर राहुल गांधी यांनी दूरध्वनी करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पवार यांना डॉक्टरांनी तीन आठवडे विश्रांती घेण्यास सांगितले आहे, अशी माहिती जयराम रमेश यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पदयात्रा आजपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये

हिंगोली : भारत जोडो यात्रा शुक्रवारी (ता. ११) दुपारी साडेचारला जिल्ह्यात दाखल होईल. हिवरा फाटा, चोरंबा फाटा येथे यात्रेचे स्वागत होईल. यात्रा जिल्ह्यात चार दिवस असेल. जिल्ह्यात यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. यात्रेचे सात नोव्हेंबरला सायंकाळी देगलूरमार्गे महाराष्ट्रात आगमन झाले. नांदेडला आज सायंकाळी राहुल गांधी यांच्या जाहीर सभेने यात्रेचा जिल्ह्यातील टप्पा पूर्ण झाला. हिंगोली जिल्ह्यातून पंधरा नोव्हेंबरला यात्रा विदर्भात जाईल.