'भारत जोडो'निमित्त खड्डे जोडो! पाच वर्षांनंतर नांदेड-देगलूर रस्त्याची दुरुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road development

नांदेड-देगलूर रस्त्याची तब्बल पाच वर्षांनंतर या रस्त्यावर टोल वसूल करणाऱ्या कंट्रक्शन कंपनीने तातडीने दुरुस्ती केली.

'भारत जोडो'निमित्त खड्डे जोडो! पाच वर्षांनंतर नांदेड-देगलूर रस्त्याची दुरुस्ती

देगलूर (नांदेड) - नांदेड-देगलूर रस्त्याची तब्बल पाच वर्षांनंतर या रस्त्यावर टोल वसूल करणाऱ्या कंट्रक्शन कंपनीने तातडीने दुरुस्ती केली. त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा या रस्त्यासाठी खड्डे जोडो यात्रा ठरली आहे.

हा रस्ता ८० किलोमीटर आहे. हा रस्ता तीन राज्यांच्या सीमेला जोडतो. महाराष्ट्रातील हा शेवटचा रस्ता आहे. यावर दोन ठिकाणी टोल वसुली केली जाते. याची इतर रस्त्यांप्रमाणे दुरवस्था झाली नसली तरी काही ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले होते. रस्त्याच्या कडेला झाडे-झुडपे वाढली होती. कडाही खचल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. पण, मागील पाच वर्षांत संबंधितांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, या रस्त्यावरून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जाणार असल्याने संबंधितांनी तत्काळ खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती केली. रस्त्याच्या कडेने असलेली झाडे-झुडपे तोडून कडा भरल्या. त्यामुळे राहुल गांधी यांच्यामुळे या रस्त्याचा विकास झाला, अशी प्रतिक्रिया या मार्गावरील नागरिकांनी दिली.

दिल्या होत्या अनेक नोटिसा

या रस्त्याची दुरुस्ती करावी, या बाबत या पाच वर्षांत नायगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला नोटिसा दिल्या होत्या. मात्र, एकाही नोटिशीची आजपर्यंत दखल घेतली नव्हती.

पूल, मैलाच्या दगडाची रंगरंगोटी

या रस्त्यावरील छोटे-मोठे पूल, सर्वच मैलाचे दगड यांचीही दोन दिवसांत रंगरंगोटी करण्यात आली.

रस्त्याची दुरुस्ती केवळ नेत्यांच्या दौऱ्यानिमित्तच करू नये. सामान्य नागरिकांसाठी ती नियमित करावी. त्यामुळे अपघात टळतील.

- कैलास भालेराव, सामाजिक कार्यकर्ते, नायगाव