Bharat jodo yatra : राहुलजी, भारत जोडताना कॉंग्रेसही जोडा!

गटबाजीने विदर्भ-मराठवाड्यात कॉंग्रेसच कॉंग्रेसचा विरोधक
Bharat Jodo Yatra Maharashtra
Bharat Jodo Yatra Maharashtraesakal

नांदेड : कॉंग्रेसला उभारी आणि भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला समाजवादी विचारांचा पर्याय देण्यासाठी राहुल गांधी यांनी भारतजोडो यात्रा सुरू केली. यातून काय साध्य व्हायचे ते होईलही. पण, आज मराठवाडा आणि विदर्भातील १९ जिल्ह्यांपैकी १६ जिल्ह्यांत गटबाजीमुळे कॉंग्रेसच कॉंग्रेसचा मोठा विरोधक आहे. जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणीही गटबाजीची पायमुळे घट्ट आहेत. त्याचाच फटका पक्षाला बसत आहे. त्यामुळे भारत जोडोसह कॉंग्रेस जोडो याचा अधिक विचार राहुल यांना करावा लागणार आहे.

औरंगाबादमध्ये नाही मोठा चेहरा

औरंगाबादमध्ये राजेंद्र दर्डा यांच्याशिवाय काँग्रेसकडे दुसरे मोठे नाव राज्य पातळीवरील नाही. पण, दर्डा‌ निवडणूक आल्यावरच सक्रिय होतात. एरवी पक्षापासून दूर राहतात. आताही भारत जोडो यात्रेपासून ते दूर आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललेय याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवार नाही. जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या वारंवार उठत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीला शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य मतदार संघात उमेदवारही मिळाला नव्हता. वरिष्ठ पदाधिकारी फक्त व्यसपीठावर खुर्च्या बळकावण्यापुरते उरलेत. डॉ. काळे यांची 'एकला चलो रे'ची भूमिका असल्याने इतर पदाधिकारी सध्या सक्रिय नाहीत. काळे आणि कार्यकर्ते असे जणू दोन गट आहेत.

बीडमध्ये पाटील यांच्या खासदारकीचा नाही उपयोग

बीड जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि डावे पक्ष प्रबळ होते. पण, नंतर गोपिनाथ मुंडे यांनी भाजपचे संघटन वाढवले. आज डाव्याकडे कार्यकर्तेही नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर असलेले क्षीरसागर, आडसकर, पंडित ही मंडळी पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर या जिल्ह्यात काँग्रेस कुमकुवत झाली. गट-तट वाढले. पक्ष नेतृत्वाने रजनी पाटील यांना दोनदा राज्यसभेवर संधी दिली. पण, पक्ष वाढीला जिल्ह्यात काडीचाही उपयोग झालेला नाही.

उपयोग झाला नाहीच्या पुढे उरल्या-सुरल्या काँग्रेसला मित्रपक्ष राष्ट्रवादी रसातळाला घालण्याच्या प्रयत्नात आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा राष्ट्रवादीने लढवविल्या. काँग्रेस लोकसभेलाही नाही आणि विधानसभेलाही लढला नाही. मग पक्ष चिन्ह तरी लोकांच्या ध्यानी कसे राहील?

उस्मानाबादमध्ये पाटील आणि चव्हाण

उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मरगळ आली. या पक्षात नव्याने ऊर्जा निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या नाही. जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत कॉंग्रेस केंद्रस्थानी होती. माजी आमदार बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण यांनी आपापले मतदारसंघ सांभाळत जिल्ह्यात कॉंग्रेस जिवंत ठेवली होती. पण, विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते पराभूत झाले. निवडणुकीतील पराभवातून पाटील आणि चव्हाण अजूनही सावरलेले नाहीत. उमरगा, मुरूम, तुळजापूर तालुक्याव्यतिरिक्त वाशीमध्ये काही प्रमाणात काँग्रेसची शक्ती होती. पण, वाशीचे नेते व तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे शिवसेनेत डेरेदाखल झाल्याने तिथेही काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले. चव्हाण आणि पाटील यांच्यातही फारसा एकोपा नाही. अमित देशमुख आणि बसवराज पाटील यांच्यातही‌‌ शीतयुद्ध आहे.

हिंगोलीत ओक्के नाही

राजीव सातव होते तेव्हाही हिंगोलीत गटबाजी होती. आताही आहे. हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणात भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे वजन वाढू लागले. आमदार डॉ. प्रज्ञा सातव आणि श्री. गोरेगावकर हे दोघेही सगळं काही ओके असल्याचे दाखवत असले तरी ओके नाही. आमदार सातव‌ यांच्याशी असलेल्या शीतयुद्धामुळेच माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवबंधन बांधले. वर्ष २०१४ मध्ये ते कळमनुरीचे आमदार होते.

दोन आमदार तरीही जालन्यात मरगळ

जालना जिल्ह्यात कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे विधानसभा आमदार आहेत. परंतु, मध्ये ते नाराज होते. त्यांचेही तळ्यात-मळ्यात होते. मंठ्याचे राजेश राठोड यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली.‌ पण, जिल्ह्यातील पक्ष संघटनेत त्याचा फायदा दिसत नाही. भाजप, शिवसेना (दोन्ही गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तीनही पक्षाच्या तुलनेत दोन‌ आमदार असतानाही पक्षाला जिल्ह्यात मरगळ आहे. कॉंग्रेस फक्त जालना शहरापुरताच राहिला आहे.‌ राठोड यांच्या मंठ्यात शिवसेना प्रबळ आहे.

नांदेड-लातूरमध्ये रिमोट कंट्रोल

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी लातूर-नांदेड जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी नाही. लातूरमध्ये ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख, अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा शब्द कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अंतिम आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचे आहे. नांदेडमध्ये चव्हाण तर लातूरमध्ये देशमुख कुटुंबीय यांच्याकडेच पक्षाचा रिमोट कंट्रोल आहे.

विदर्भात जिल्हे अकरा; पक्षाचे वाजले बारा

अमरावती जिल्हा वगळता इतर दहा जिल्ह्यांत गोंदियातील आमगाव ते बुलडाण्यातील खामगावपर्यंत गट, कार्यकर्ते, नेते यांच्यात इगो-मतभेद आहेत. वाशीम जिल्ह्यात ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख पक्षात नसले तरीही त्यांचे कार्यकर्ते जिल्हा कार्यकारिणीत आहेत. त्यामुळे त्यांचा गट आहे. देशमुख गटाचे आमदार अमित झनक गटाशी राजकीय वैर आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या गोंदिया जिल्ह्यातही सर्वकाही अलबेल नाही.

उपराजधानी नागपुरात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांचे तोंड दोन वेगवेगळ्या दिशेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेच एकमेकांचे विरोधक आहेत. गडचिरोली जिल्ह्यात तर काँग्रेसचे तीन गट सक्रिय आहेत. भंडाऱ्यातही काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. बुलडाणा म्हटले ओठांवर नाव येते ते ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचे. मात्र, वासनिक यांच्या कर्मभूमीत काँग्रेसमध्ये गट-तट आहेत. सात मतदारसंघांमध्ये दोन आमदारांची संख्या एकावर आली. वासनिक आतापर्यंत जिल्ह्यापासून दूर होते. पण, भारतजोडोनिमित्त दोन‌ महिन्यांपासून ते बुलढाणा वार्‍या करीत आहेत. अकोला हा माजी मंत्री दिवंगत बाबासाहेब धाबेकर यांचा जिल्हा. मात्र, आता अकोल्यात वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ भाजपचेही वजन वाढले आहे. अंतर्गत गटबाजीमुळे त्रस्त झालेले कार्यकर्ते अजूनही सावरलेले नाहीत. नव्या-जुन्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com