काटे कुठेच नव्हते... दगा दिला फुलांनी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old Women

ज्यांच्याकडे ‘माय’ आहे तो जगातला श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जातो. याच आईला काहिजण विसरून जातात. नव्हे तर चक्क घरातून हाकलून आपल्या संसारात रममान होतात.

Motivational News : काटे कुठेच नव्हते... दगा दिला फुलांनी!

भोकर - ज्यांच्याकडे ‘माय’ आहे तो जगातला श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जातो. याच आईला काहिजण विसरून जातात. नव्हे तर चक्क घरातून हाकलून आपल्या संसारात रममान होतात. अशीच काहीशी घटना शहरात उघडकीस आली आहे. पोटच्या गोळ्यांनीच ‘आईला’ घराबाहेर काढल्याने ती निराधार झाली. येथील नवयुवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वृद्ध महिलेला आधार दिला. ‘काटे कूठेच नव्हते दिला दगा फुलांनी’ अशी खंत त्या महिलेने या वेळी व्यक्त केली.

आई-वडील हेच खरे दैवत मानून बहुतेकजन मरेपर्यंत सेवा करून आशीर्वाद घेण्यात धन्यता मानतात. आई-वडीलांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने स्वताला भाग्यवान समजतात. अशा सुसंस्काराने ओतप्रोत भरलेल कुटुंब एक आदर्श मानल्या जाते. दुसरीकडे याच्या उलट चित्र पाहावयास मिळत आहे. कुणी मालमत्ता, आर्थिक, जमीन-जुमला, घरातील अतंर्गत वादांमुळे जन्मदात्या आईलाच दुजाभाव करतात. आपल्या मुलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपून काळजी घेतली अशा माय बईमान होत आहेत. अशीच घटना भोकर शहरात घडल्याने उघडकीस आली आहे.

शहरातील प्रफुल्ल नगरात असलेल्या विठ्ठल मंदिराच्या ओट्यावर एक वृद्ध महिला सतत चार ते पाच दिवसांपासून ठाण मांडून बसल्याचे निदर्शनास आल्याने येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे नवयूवक माधव पवार, अंकुश गौड रतनवार यांनी तिची विचारपूस करून आठवडाभर सेवा केली. दरम्यान ही बाब येथील सामाजिक यूवा कार्यकर्ते संदीप गौड पाटील कोंडलवार यांना लक्षात येताच त्यांनी वृद्ध महिलेची चौकशी केली असता त्या महिलेचा मुलगा आणि सुनेच्या जाचाला कंटाळून घर सोडून मंदिराचा आसरा घेतल्याचे सांगितले आहे.

आता माझ्या जगण्याला अर्थ नाही मला जीवन संपवायचं आहे. मी माझ्या घरी सुखी राहणार नाही, मला वृद्धाश्रमात सोडा, अशी इच्छा त्या महिलेने व्यक्त केली. ही करुण कहाणी ऐकून त्या युवकांनी सदरील मुलाशी संपर्क साधून आईला मुलांच्या स्वाधीन केले आहे.

...अन् तिला दिली दृष्टी

मंदीराच्या या ओट्यावर आसरा घेतलेल्या वृद्ध महिलेस डोळ्याने दिसत नव्हते. ही बाब लक्षात येताच संदीप गौड कोंडलवार यांनी स्वतः पैसे खर्च करून डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्याने महिलेला ‘दृष्टी’ दिल्याने तिने भरभरून आशीर्वाद दिला आहे.

युवकांच्या कार्याचे कौतुक

जगात माणुसकी हरवलेली माणसं असले तरी माणुसपण जपणारी आणि ह्रदयात ममत्वाचा ओलावा कायम ठेवणारीही माणसं आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे भोकर शहरातील माधव पवार, अंकुश रतनवार, संदीप कोंडलवार यांनी सामाजिक भान ठेवून एका महिलेल्या दिलेल्या आधाराचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.