esakal | हवेत गोळीबार करून चोरट्यांनी सराफ व्यापाऱ्यास लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

chor

रिठ्ठा शिवारात पल्सर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दोघांना अडवून हवेत गोळीबार करून धाक बसविला. 

हवेत गोळीबार करून चोरट्यांनी सराफ व्यापाऱ्यास लुटले

sakal_logo
By
बाबुराव पाटील

भोकर (नांदेड) : शहरातील सोन्या चांदीचे व्यापारी आपला नित्याचा व्यवसाय करून सोमवारी (ता.पाच) सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान दुचाकीवर मुदखेडकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी रिठ्ठा शिवारात पल्सर दुचाकीवरुन व्यापाराचा पाठलाग केला. तसेच हवेत गोळीबार करून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोने चांदी आणि रक्कम असलेली बॅग हिसकावून पसार झाले. पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बहूतांशी सोन्या-चांदीचे व्यापारी हे मुदखेड येथील मूळ रहिवासी आहेत. अनेक वर्षांपासून आपला व्यवसाय करून ते नियमित गावाकडे जातात. सोमवारी (ता.पाच) सराफ व्यवसाय करून व्यापारी सुभाष दगडू शहाणे आणि त्यांचा कारागीर किशन भूजंग पांचाळ हे दोघे दुचाकी क्रमांक (एम.एच.२६-बीएस-००८३) मुदखेड कडे जात होते. दरम्यान रिठ्ठा शिवारात पल्सर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दोघांना अडवून हवेत गोळीबार करून धाक बसविला. 

व्यापाऱ्यांमध्ये घबराट

व्यापारी सुभाष यांच्या गळ्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन तोळे सोने, चांदी आणि चाळीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजार रूपये असलेली बॅग लंपास केली. या घटनेची माहिती पोलिस उपनिरीक्षक शंकर डेडवाल व अनिल कांबळे यांना मिळताच त्यांनी घटणास्थळी भेट देऊन पाहणी केली व सोमवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी गोळीबार करून नांदेडमध्ये आरोपींनी व्यापाऱ्यांना लुटले होते. दिवसेंदिवस नांदेड जिल्ह्यामध्ये लुटमारीच्या घटना वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिलेच्या गळ्यातील गंठण पळवले

नांदेड : शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण बळजबरीने पळविले आहे. अधिक माहिती अशी की, कुसुमबाई बापुराव मोरे आपल्या मैत्रिणीसह नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी फिरायला गेले होते. आयटीआय चौकातून शंकरराव चव्हाण पुतळ्याजवळ आल्यानंतर सदर महिला रस्ता ओलांडत होते. त्यादरम्यान काळ्या रंगाचा जॅकेट घालून दुचाकीवर आलेल्या आरोपींनी कुसुमबाई मोरे यांच्या गळ्यातील एक तोळा चार ग्रॅमचे शाॅट गंठण तसेच इतर दोघींच्या गळ्यातील प्रत्येकी सात ग्रॅमचे पोती बळजबरीने हिसकावून पळवून नेले आहे. कुसुमबाई मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. थोरवे पुढील तपास करत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top