esakal | कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपी वेणीकरांच्या अडचणीत वाढ, बिलोली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी (ता. चार) फेटाळून लावला.

कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपी वेणीकरांच्या अडचणीत वाढ, बिलोली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

sakal_logo
By
विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : मागील वर्षभरापासून फरार असलेले कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यातील फरार आरोपी संतोष वेणीकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाकडे दुर्लक्ष करुन न्यायालय व तपास यंत्रणेची दिशाभूल करीत असल्याचे नमूद करून बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी (ता. चार) फेटाळून लावला. त्यामुळे फरार आरोपी संतोष वेणीकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून सीआयडीकडे शरण गेल्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील इंडिया मेगा ऍग्रो लिमिटेड कंपनीत जुलै २०१८ मध्ये शासकीय धान्याचा घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. संबंध महाराष्ट्रभर गाजलेल्या या प्रकरणात २० पेक्षा अधिक आरोपीस आजपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याच प्रकरणात आरोपी असलेले तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे अद्यापपर्यंत फरारी आहेत. नायगाव व बिलोली येथील न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनवणे यांनी वेणीकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर वेणीकर यांनी १७ सप्टेंबर २०१९ रोजी याप्रकरणी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली.

हेही वाचानांदेड : देगलूरमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून मातेसह तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू -

सर्वोच्च न्यायालयाने आरोपीस काही प्रमाणात दिलासा देत तीन दिवसात कुंटुर पोलिस ठाण्यात स्वतः हून अटक होवून पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याची सूचना केली होती. वर्षभरापासून फरार असलेले आरोपी संतोष वेणीकर यांना ही संधी होती. मात्र वेणीकरांनी पोलिस ठाण्यात हजर न होता कुंटुर पोलिसच मला अटक करुन घेत नाहीत असे युक्तिवाद करणारे खोटे पत्र दाखल केले व न्यायालयाने आपल्याला अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी विनंती बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती.

याप्रकरणी बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी आरोपी वेणीकर हे कायद्याचे चांगले जाणकार असून ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचा दुरुपयोग करुन न्यायालय व तपास यंत्रणेची दिशाभूल करीत असल्याचे मत नोंदवून वेणीकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. संदीप कुलकर्णी कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली तर आरोपीच्या वतीने अॅड. डी. के. हांडे यांनी बाजू मांडली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image