कावळ्यावर बर्ड फ्लूचे संकट; पिंडदानावर कोरोनानंतर पुन्हा संक्रांत

file photo
file photo

नांदेड : कोरोना काळात ज्या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला तर त्याची अस्थी नातेवाईकांना देण्यात येत नव्हती. त्यामुळे अनेक कुटुंबाना पिंडदानाच्या महत्वाच्या विधीला मुकावे लागले. एवढेच नाही तर हे संकट संबंध जगावर आल्याने आपल्या नातेवाईकांना निरोपही देता येत नव्हता. यातून आता कशीतरी सुटका होत असतानाच पुन्हा पिंडदानासाठी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कावळा या पक्षावर मोठे संकट आले आहे. बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पिंडदान विधीवर कोरोनानंतर पुन्हा संकट कोसळले आहे. 

पृथ्वीतलावर अगोदरच कावळा व इतर पक्षांची कमी होत चाललेली संख्या ही विचार करणारी आहे. जंगल नष्ट होत असल्याने तसेच ईंटरनेटचाही फटका पक्षांना बसत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. तरीसुद्धा पिंडदान करण्याची परंपरा आजही हिंदू धर्मात आहे. दशक्रिया हिंदू चालीरितीनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. व्यक्तीच्या निधनानंतर अस्थी संचयन ते दहा दिवसांपर्यंत विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये स्नान, मृत्तिका स्नान, एक पिंडदान, विषम श्राद्ध, वपन, मडक्यावर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधीचा समावेश होतो.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्यूनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहाव्या दिवशी विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ती मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ती मिळते. कारण कावळ्याच्या रुपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कावळा कधीकधी पिंडाला शिवत नाही, अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा करुन पिंडाला स्पर्श करुन कावळा शिवला असे मानतात.

काय आहे अख्यायीका 

एकदा राम वनवासात झोपले असताना कावळा तिथे येतो, आणि तो सीतेला त्रास देत असतो. काही केल्या तो सितेचा पिच्छा सोडत नाही. तेव्हा त्रासून सिता रामाला उठवते आणि कावळा कसा त्रास देतो ते सांगते. त्यावेळेस श्रीरामाकडे धनुष्यबाण नसतो म्हणून तो जवळच पडलेली गवताची काडी घेऊन कावळ्यावर फेकतो. तर ती काडी ( मंत्रित दर्भ ) कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेते आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो. म्हणून त्याला एकाक्ष म्हणतात. त्याच वेळेस सीता त्याला शाप देते हे तू एकाक्ष असल्याने तुला सगळे अशुभ मानतील. तेव्हा कावळा गयावया करून सितेला उ: शाप मागतो. तेव्हा त्याची दया येऊन सीता त्याला उ:शाप देते.

असे की. मनुष्य मृत्त झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला स्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही शिवाय दर्भाची काडीसुद्धा त्यावेळेस उपयोगी पडेल. काकगतीही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणाऱ्या लिंग देहाच्या गतीशी साधर्म्य दर्शविते. कावळ्याचा रंग हा रजतमदर्शक असल्याने तो पिंडदान या रजतमात्मक कार्याशी संबंधित विधि साधर्म्य दर्शवितो. कावळ्याभोवती असलेल्या सूक्ष्म कोषातही लिंगदेहाभोवती असलेल्या कोषासारखे आपकणाचे प्राबल्य असल्याने लींगदेहाला कावळ्याच्या देहात प्रवेश करणे सोपे जाते. वासनात अडकलेले लिंगदेह हे भूलोक, मृत्युलोक आणि स्वर्गलोक यामध्ये अडकलेले असतात. असे लिंगदेह पृथ्वीच्या वातावरण कक्षेत प्रवेश केल्यावर कावळ्याच्या देहात प्रवेश करून पिंडातील अन्न भक्षण करतात, म्हणजेच पिंडाला स्पर्श करतात. पिंडदानाचे महत्व गरुड पुराणात दिलेले आहे. 
- संजय गुरु बेलथरकर, लोकमित्रनगर, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com