ब्रेकिंग न्यूज - नांदेडला धडकले कोरोनाचे वादळ...

file photo
file photo

नांदेड - कोरोना संशयितांचा स्वॅब तपासणी अहवाल बुधवारी (ता. तीन) प्राप्त झाल्यानंतर खळबळ उडाली असून सकाळी दोन तर सायंकाळी २१ असे दिवसभरात २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्हची संख्या १७५ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. 

गेल्या दोन तीन दिवसापासून लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असताना आणि अनेकजण बरे होऊन घरी जात असताना बुधवारी (ता. तीन) धक्कादायक घटना घडली आहे. दिवसभरात तब्बल २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

सकाळी दोन रुग्ण आढळले
बुधवारी (ता. तीन) सकाळी १०१ अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन रुग्ण कोरोना  पॉझिटिव्ह आढळले तर ८९ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच सात नमुने नाकारण्यात आले. इतवारा येथील ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असून ती रेशन ग्राहक महिला असल्याची माहिती आहे. तिला इतवारातील बाधित रेशन दुकानदाराच्या संपर्कातून संसर्ग झाल्याची शक्यता आहे. तसेच मुखेडच्या भेंडेगावमध्ये आणखी एक कोरोना बाधित आढळून आला आहे. तो २१ वर्षीय युवक असून आधीच्या दोन्ही बाधितांच्या संपर्कात तो आला होता. 

संध्याकाळी निघाले तब्बल २१ पॉझिटिव्ह
दरम्यान, बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालात तब्बल २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील ११ रुग्णांचा त्यात समावेश आहे. या ठिकाणी डॉक्टर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे उर्वरित त्याच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक आहेत. त्याचबरोबर शिवाजीनगर भागातील नई आबादी येथील नऊ रुग्ण आढळून आले आहेत. बाधित कामगार कुटुंबातील त्याचे सदस्य व नातेवाईक आहेत. तसेच आमदापुर (ता. देगलूर) येथे एक नवीन रूग्ण आढळून आला आहे. 

एकूण रुग्णांची संख्या १७५ वर
नांदेड जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७५ वर गेली आहे. बुधवारी संध्याकाळी १३२ अहवाल प्राप्त झाले असून त्यात २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नाकारलेले नमुने सहा तर अनिर्णित सहा आहेत. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच जनतेने आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com