व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळणारा लाचखोर पोलिस कोठडीत

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 7 October 2020

विशेष म्हणजे पोलिसाला संशय आल्याने तक्रादाराला धक्काबुक्की करुन एसीबीचे व्हाईस रेकॉर्डर पळवून त्यातील मेमरी कार्डची तोडफोड केली मात्र त्याला एसीबीच्या पथकानी अटक केली.

नांदेड : अवैध दारु विक्री प्रकरणात पत्नीच्या नावाचा समावेश करत नाही म्हणून दोन हजाराची लाच मागणारा लाचखोर पोलिस मंगळवारी (ता. सहा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. विशेष म्हणजे पोलिसाला संशय आल्याने तक्रादाराला धक्काबुक्की करुन एसीबीचे व्हाईस रेकॉर्डर पळवून त्यातील मेमरी कार्डची तोडफोड केली. मात्र त्याला एसीबीच्या पथकानी त्याचा पाठलाग करुन शनिदेव मंदीर रस्त्याच्या वळणावर शिवाजीनगर मुखेड येथून अटक केली. बुधवारी (ता. सात) नांदेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असून पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. अशाच एका दारुबंदी प्रकरणात मुखेड पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पत्नीला आरोपी न करण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यातील पोलिस राजेंद्र मारोती पंचलिंग याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे आरोपी राजेंद्र पंचलिंग याने तक्रारदाराच्या खिशातील शासकीय व्हाईस रेकॉर्डर काढून घेऊन पळ काढला. आणि त्यातील मेमरी कार्ड नष्ट केले.

हेही वाचानांदेड : वाळू माफियाकडून नायब तहसिलदारावर हल्ला, मुगाजी काकडे जखमी

सापळ्यात पोलिस कर्मचारी राजेंद्र पंचलिंग अडकला

अवैध दारू विक्री प्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नीला आरोपी न करण्यासाठी पोलिस कर्मचारी राजेंद्र पंचलिंग याने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या सापळ्यात पोलिस कर्मचारी राजेंद्र पंचलिंग दोन हजार रुपयांची लाच मागणी करताना आढळून आले.
 
शासकीय व्हॉइस रेकॉर्डर हिसकावून घेतले

दरम्यान राजेंद्र पचलिंग त्याने तक्रारदारास आधार कार्डची झेरॉक्स आणण्यास पाठविले. त्यानंतर पंचलिंग याला संशय आल्याने तक्रारदाराच्या पाठोपाठ झेरॉक्स दुकानावर जाऊन त्याने तक्रारदाराचे खिसे तपासले. त्यात तक्रारदाराच्या खिशात असलेले शासकीय व्हॉइस रेकॉर्डर हिसकावून घेतले. आणि तेथून पोबारा केला त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून व्हाईस रेकॉर्ड ताब्यात घेतल्यानंतर त्यातील मेमरी कार्ड नष्ट केल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुखेड पोलिसात लाचेचा आणि मेमरी कार्ड नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे क्लिक करा अनाधिकृतपणे स्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा गुन्हा- डाॅ. विपीन

पथकात यांनी घेतले परिश्रम

पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहूल पखाले, कर्मचारी बालाजी तेलंगे, गणेश केजकर, गणेश तालकोकुलवार, सचीन गायकवाड, अनिल कदम यांचा सहभाग होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribe-taker fleeing with voice recorder in police custody nanded news