मुखेडमध्ये घरात घुसून मारहाण केली आणि महिलेच्या....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

घरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना बेळी खु. (ता. मुखेड) येथे शनिवार (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास घडली.

नांदेड : पैशाच्या देवाण- घेवाणीतून एकाच्या घरात घूसुन मारहाण केली. एवढेच नाही तर घरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना बेळी खु. (ता. मुखेड) येथे शनिवार (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास घडली. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, बेळी येथील हाणमंत तुकाराम आगलावे (वय २५) यांचा आणि मारेकऱ्यांचा पैसे देवाण- घेवाणीतून वाद सुरू होता. या वादातून मारेकरी हणमंत आगलावे यांच्या घरात जबरीने घुसले. त्यांच्याशी वाद घालून शिविगाळ केली. त्यांना लाथाबुक्यानी मारहाण करती असतांना त्यांची पत्नी वाद सोडविण्यासाठी पुढे आली असता तिच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने चोरुन नेले. एवढेच नाही तर या दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिली. हाणमंत आगलावे यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. काळे करत आहेत. 

 हेही वाचाका केला सासरच्यानी विवाहितेचा छळ?...वाचा

बिलोली शहरात ४० हजाराची घरफोडी 

नांदेड : बिलोली शहरातील देशमुख गल्ली भागातील एक अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सोन्या- चांदीचे दागिणे असा ४० हजाराचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी सोमवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास घडली.
 
बिलोली शहरातील देशमुख गल्लीमध्ये निकिता त्रीरत्न भोसले (वय २८) यांचे घर आहे. त्या सोमवारी आपले घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सकाळी साडेदहा वाजता घराबेहर पडलेल्या निकीता भोसले ह्या परत दुपारी एकच्या सुमारास घरी आल्या. घरी आल्यानंतर घराचे कुलूप तोडलेले  त्यांना दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता कपाटातील सोन्या- चांदीचे दागिणे असा ४० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. त्यांनी लगेच बिलोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपल्या घरी चोरी झाल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर निकिता भोसले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. वाडेकर करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Broke into a house in Mukhed and beat up a woman nanded news