
नांदेड ः अनेक गल्ली, मोहल्ल्यात चमकोगिरी करीत भाईगिरी, दादागिरीचा रुबाब आणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी शहरामध्ये भाईगिरींची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून व्यापाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण तर झालीच; शिवाय भाईगिरीचे पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शहरात भाईगिरी, दादागिरीचे प्रमाण वाढले असून स्वतःला मोठे डॉन समजून व्यापाऱ्यांना खंडणी मागत आहेत. नाकारले तर दहशत निर्माण करण्यासाठी व्यापाऱ्यांवर हल्ला करण्यासही हे डॉन मागेपुढे पाहत नाहीत. असाच प्रकार शनिवारी दुपारी शहरातील जुना मोंढा भागात घडला. येथील लालवाणी पेट्रोल पंपार खंडणीसाठी राडा करीत पंपाच्या चालकावर खंजिरने हल्ला करत त्यांना दुखापत केली. या प्रकारामुळे जुना मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
शनिवारी दुपारी लालवाणी पेट्रोल पंपावर अनिल लालवाणी हे बसलेले असताना आरोपी हातात खंजीर घेऊन त्या ठिकाणी आला. दरम्यान त्याने पेट्रोल भरणाऱ्या वाहनधारकांशी हुज्जत घातली. त्यानंतर पेट्रोल पंपावर केबिनमध्ये शिरला. या ठिकाणी त्याने अनिल लालवाणी यांना दर महिन्याला खंडणी देण्याची धमकी दिली. यावेळी लालवाणी यांनी नकार देत उठून गेले. त्याचवेळी आरोपीने त्यांच्या मागे धाव घेत त्यांच्यावर खंजीरने वार केला. यामध्ये लालवाणी यांच्या बोटाला दुखापत झाली.
विशेष म्हणजे ही बाब कळाल्यानंतर पोलिसांनी पेट्रोलपंपावर धाव घेतली. परंतु, आरोपीने पोलिसांनाही दाद दिली नाही. पोलिसांना खंजीर दाखवून जवळ आल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे आता शहरातील भाईगिरीचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनाही ते घाबरत नसल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.
डॉनमध्ये सोनसाखळीची क्रेझ
सध्या ७० ते ८० प्रकारच्या चेन उपलब्ध आहेत. त्या एक तोळ्यापासून तर दहा तोळ्यापर्यंत आहेत. शिवाय ऑर्डर दिली तर त्यापेक्षाही जास्त वजनाची चेन तयार करून दिली जात आहे. ब्रेसलेटमध्येही चार ते सहा प्रकार आहेत. कडे आणि कानातील बाळ्याही अनेक प्रकारच्या आहेत. त्यामुळे अंगावर सोनेरी साज चढवून अनेकजण शहरामध्ये गुंडगिरीचे प्रदर्शन भरवून दहशत निर्माण करत आहेत.
गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिस अपयशी
शहरात सध्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर जीवघेण्या हाणामाऱ्यांपर्यंत जाण्याचे प्रकार वाढले आहेत. अवैध धंदे खुलेआम सुरू असून वाढती दादागिरी शहरवासीयांची डोकेदुखी बनत आहे. या गुन्हेगारी प्रकारांवर आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. शहरात गेल्या काही दिवसांत खुलेआम गुन्हे घडून येत आहेत. शहरात बेशिस्त वाहतूक, मटका, जुगार, विविध ढाब्यांवर चालणारी अवैध दारूविक्री, तर ऑटोचालकांची मनमानी यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. अल्पवयीन मुले बेदरकार पद्धतीने ऑटो चालवत असून त्यावरही काहीच कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून समोर येत आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.