
नांदेड : उन्हाळ्याची चाहूल लागताच शीतपेय विक्रेत्याची लगबग सुरु होते. उन्हाळ्यातील शीतपेय म्हणजे अतृप्त मनाची तहान भागवणारे अमृतच म्हणावे लागेल. त्यात आईस्क्रीम, कुल्फी, मठ्ठा व रेडिमेट इतर शीतपेय आदींचा समावेश आहे.
पुढील आठ महिने कसे काढावेत
फेब्रुवारी ते मे या चार महिन्याच्या कालावधीत केलेल्या धंद्याच्या भरवशावर वर्षातील उर्वरित आठ महिन्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केल्या जाते. हा व्यवसाय करणारे बहुतांशजण बेरोजगार आहेत. मात्र यावर्षी शीतपेयाचा धंदा सुरु करण्याच्या सुरुवातीला २४ मार्चपासून लाॅकडाउन जाहीर करण्यात आल्याने या व्यावसायिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे पुढील आठ महिने आपला प्रपंच कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
थंड पेयांची मागणी घटली
कोरोनाच्या धास्तीमुळे शहरातील शीतपेय गृह, रसवंतिगृहे सद्यःस्थितीत बंद अवस्थेत आहेत. तर उन्हाळ्यात उसाच्या रसाला विशेष मागणी असते. लोक रसवंतीमध्ये जाऊन किंवा हात ठेल्यावर रस पिऊन तृप्त होतात. मात्र, दुकाने मार्च महिन्यापासून बंदच आहेत. सद्यस्थितीत प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थंड पदार्थ पिण्यास मनाई केल्या जात आहे. त्यात शीतपेय, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रिम व इतर थंड पदार्थ हानिकारक समजल्या जात आहे. लोकही आरोग्याची काळजी घेत थंड पेयापासून दूरच राहणे पसंत करीत आहेत.
आर्थिक गणित बिघडले
उन्हाळ्याची चाहूल लागताच व्यावसायिकांनी लाखोंची गुंतवणूक करत साहित्याची खरेदी केली आहे. कित्येकांनी शितपेयाची आॅर्डर बुक करून पैसेही दिलेले आहेत. हा माल काहींकडे आला, तर अनेकांचा माल ट्रान्सपोर्टमध्ये अडकून पडला आहे. लावलेला पैसा निघणार नाहीच, उलट तोटाच सहन करावा लागणार असल्याने व्यावसायिकांचे गणित आजघडीला पूर्णपणे बिघडले आहे.
हे देखील वाचाच - लॉकडाउनचा असाही फायदा : बालविवाहाचा धडाका -
रसवंती, ऊस उत्पादकांच्याही डोळ्यात पाणी
उन्हाळा सुरू झाला की, उसाचा गोडवा चाखण्यासाठी ग्राहकांची रसवंती गृहावर दिवसभर गर्दी असते. त्यामुळे रसवंती, उसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हीच गरज ओळखून बहुसंख्य शेतकरी या उत्पादनाकडे वळले. येथील बेरोजगार युवकसुद्धा या व्यवसायाकडे वळतात. मात्र, यंदा त्यांची घोर निराशा झाली. रसवंत्या बंदच असल्याने उसाला मागणी नाही. परिणामी शेतातच ऊस पीक वाळताना बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
कोरोनामुळे मोठे नुकसान झाले
दुष्काळ आणि गारपिटीमुळेही उसाचे एवढे नुकसान होत नाही. मात्र, कोरोनामुळे तर कंबरडेच मोडले आहे. मार्च ते मे या तीन महिन्यात रसवंती चालवून वर्षभराचा खर्च भागवावा लागतो. कोरोनामुळे आमचे मोठे नुकसान झाले.
- सदाशिव कोपरखळेकर (रसवंती व्यावसायिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.