एक लाख ८० हजार क्विंटल धान्य खरेदी....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर
गुरुवार, 4 जून 2020

जिल्ह्यात शेतीमालाचे दर पडल्यामुळे शासनाने खरेदीमध्ये हस्तक्षेप करून केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार तूर, हरभरा, सोयाबीन खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात १६ ठिकाणी धान्य खरेदी केंद्र सुरू झाले.

नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेनुसार जिल्ह्यात सोळा ठिकाणी तूर व हरभरा खरेदी सुरू आहे. या खरेदी केंद्रावर १६ हजार २६४ शेतकऱ्यांचा एक लाख ७९ हजार क्विंटल धान्य खरेदी झाली आहे. धान्याचे ९१ कोटी ४१ लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली.

सोळा खरेदी केंद्रावर धान्य खरेदी 
जिल्ह्यात शेतीमालाचे दर पडल्यामुळे शासनाने खरेदीमध्ये हस्तक्षेप करून केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार तूर, हरभरा, सोयाबीन खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात १६ ठिकाणी धान्य खरेदी केंद्र सुरू झाले. यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नांदेड, मुखेड, किनवट, हदगाव व देगलूर या सहा ठिकाणी तूर व हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले. या खरेदी केंद्रावर साडेतीन हजार शेतकऱ्यांचा ६२ हजार ९०३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. 

हेही वाचा....

विदर्भ को-ऑपरेटिव्ह व महा एफपीसीकडूनही खरेदी
या सोबतच विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन करून नायगाव, भोकर व धर्माबाद या तीन ठिकाणी दोन हजार ३२ शेतकऱ्यांचा ३५ हजार ३९८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. तसेच महाराष्ट्र फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून (महा एसएससी) जिल्ह्यातील धानोरा (ता. धर्माबाद), करडखेड (ता. देगलूर), बरबडा (ता. नायगाव), डोणगाव (ता. बिलोली), नारनाळी (ता. कंधार), मांडवा (ता. किनवट) व धानोरा मक्ता (ता. लोहा) या ठिकाणी हरभरा खरेदी सुरू आहे. या १६ खरेदी केंद्रावर आजपर्यंत एक लाख ३८ हजार ५४७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांना ६७ कोटी ५४ लाख रुपयांचे चुकारे देण्याचे काम सुरू असल्याची माहिती श्री फडणीस यांनी दिली. 

हेही वाचलेच पाहिजे.... 

तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ
यासोबतच जिल्ह्यातील १६ ठिकाणी तूर खरेदी सुरू आहे. शासनाने तून खरेदीला नुकतीच ता. १४ जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील आठ हजार ३१५ शेतकऱ्यांची ४१ हजार १५४ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. या खरेदी पोटी शेतकऱ्यांना २३ कोटी ८६ लाख ९८ हजार रुपये त्यांच्या खात्यावर देण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून मिळाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buy one lakh 80 thousand quintals of grain .... read it somewhere