कायद्याचा बडगा : निवडणूक कर्तव्यात कसुर; नांदेडच्या 46 कर्मचाऱ्यांवर गुन्हा होणार दाखल

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 13 January 2021

दोन्ही प्रशिक्षणासाठी नियुक्ती आदेश दिलेले 46 कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना आज बुधवार दुपारी तीन वाजेपर्यंत संधी देण्यात आली आहे.

नांदेड : लोहा तालुक्यातील 77 ग्रामपंचायतसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती व त्यांना दोन प्रशिक्षण देण्यात आले पण या दोन्ही प्रशिक्षणासाठी नियुक्ती आदेश दिलेले 46 कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना बुधवार (ता. १३) दुपारी तीन वाजेपर्यंत संधी देण्यात आली आहे. यावेळेत ते तहसील कार्यालयात उपस्थित झाले नाही तर त्या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.

लोहा तालुक्यातील 77 ग्रामपंचायतसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम 1959 चे नियम (6) अन्वये उपरोक्त दिनांकास होणाऱ्या निवडणुकीसाठी तहसीलदार यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 व 3 अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना पहिले प्रशिक्षण ता. 26 डिसेंबर व दुसरे प्रशिक्षण ता. 7 जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात देण्यात आले. या प्रशिक्षणात राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी त्यासाठीचे प्रशिक्षण तहसीलदार विठ्ठल परळीकर व टीमने दिले.

ज्या कर्मचाऱ्यांची या निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली होती त्यात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी असे 46 जण दोन्ही प्रशिक्षणास गैरहजर राहिले. त्यांना तहसील कार्यालयाने रीतसर नोटीस बजावली तरीही त्यांनी त्या नोटीसीला उत्तर दिले नाही व ते कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर झाले नाहीत.

तहसीलदार श्री परळीकर यांनी या सर्व गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. १३) दुपारी तीन वाजेपर्यंत हजर राहावे अन्यथा लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 134 अन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल यांची संबंधित गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आदेश तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या व अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तहसीलदार यांनी कायद्याचा 'बडगा" उगारला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against 46 Nanded employees for violating the election law nanded news