मोहरमसुद्धा साध्‍या पद्धतीने साजरा करा- एसपी विजयकुमार मगर

प्रल्हाद कांबळे
Sunday, 23 August 2020

सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम, दुखवटा करु नये. वाझ, मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया, आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही.

नांदेड : कोव्हीड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहेत. या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम, दुखवटा करु नये. वाझ, मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया, आलम काढण्यास परवानगी देता येणार नाही. ताजिया, आलम घरीच, घराशेजारी बसवून तेथेच शांत, विसर्जन करण्यात यावेत. सबील, छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये. या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. कोणत्याही कार्यक्रमात चार पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसल्याचे मार्गदर्शक सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वच्छते विषयक जनजागृती करावी

कोविड-19 च्या परिस्थितीचा विचार करता रक्तदान, प्लाज्मा, आरोग्य  शिबिरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छते विषयक जनजागृती करावी. याचबरोबर कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही गृह विभागाने दिलेल्या सुचनांमध्ये म्हटले आहे.

 हेही वाचा -  पुन्हा काका- पुतण्याचा वाद चव्हाट्यावर, काकाचा मावेजा उचलण्याचा पुतण्याचा डाव धुळीला -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या सुचना

नांदेड : जिल्ह्यातील गणेशोत्सव सण साजरा होत असतांना या काळात लोकांनी अधिकाधिक स्वत: ची सुरक्षितता घेऊन कोरोनाच्या सार्वत्रिक प्रसाराला रोखण्यासाठी जबाबदारीने सर्व शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे. याबाबत शासनाने वेळोवेळी सुचना व निर्देश असणारे आदेश निर्गमीत केले आहेत. ता. आठ ऑगस्ट अन्वये निर्गमीत करण्यात आलेल्या सुचनांमध्ये आता पुढील सुचना या समाविष्ट करण्यात येत आहेत.

सार्वजनिक गणपतीचे विसर्जन हे शक्य तो स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावे

जिल्ह्यातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन हे शक्य तो स्थानिक स्वराज्य संस्थांनी जसे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादींनी गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव, हौदामध्ये विसर्जनासाठी आपापल्या गणेशमुर्ती या संकलन केंद्राकडे सुपुर्द जमा कराव्यात. याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी व मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी 50 वर्षावरील नागरिकांना व दहा वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही. कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, निर्देश याचे पालन करणे बंधनकारक राहिल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate Moharram in a simple way too SP Vijaykumar Magar nanded news