दिव्यांगांसमोर शिक्षणाच्या प्रवाहात टिकण्याचे आव्हान

प्रमोद चौधरी
Thursday, 1 October 2020

शारीरिक व्यांगावर मात करत शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे शिक्षकांसह पालकांसमोर मोठे आव्हान आहे.

नांदेड :  कोरोना महामारीमध्ये आॅनलाईन शिक्षण प्रक्रिया सामान्य विद्यार्थ्यांना आकलनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. त्या तुलनेत विशेष शैक्षणिक गरज असलेल्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसमोर तर अडचणींचा पाढाच आहे. सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांकडे आॅनलाईनसाठी अॅंड्राइड मोबाईल, काॅम्प्युटर, इंटरनेटचा अभाव आहे. शारीरिक व्यांगावर मात करत शिक्षणासाठी धडपडणाऱ्या या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे शिक्षकांसह पालकांसमोर मोठे आव्हान आहे.  

शाळा स्मार्टफोन, मोबाईल, व्हाटसअप, दीक्षा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. शाळांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व इतर आवश्यक पुस्तके उपलब्ध करून दिलीत. दिव्यांगांमध्येही विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे गट पाडून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या माध्यमातून केला जात आहे. पण अनेक पालकांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी लागणारी साधने उपलब्ध नाहीत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात या सुविधांचा अभाव आहे.   

हेही वाचा - दिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती

जिल्ह्यातील सर्व शाळांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी तयार केली. दिव्यांगांच्या प्रकारानुसार व्हॉटस अॅप ग्रुप केले. दिक्षा अॅपच्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या लिंक पाठवल्या जातात. तसेच शिक्षकांकडून विविध विषयाच्या क्लिप तयार करून टाकल्या जातात. गृहभेटीही दिल्या जातात. पण दिव्यांग विद्यार्थ्यांना कितपत समजते, हे ते पण सांगू शकत नाहीत. शिवाय आर्थिक व इतर अडचणीमुळे बहुतांश पालकांचे दिव्यांग मुलांच्या शिक्षणाकडे म्हणावे तसे लक्ष नसते. कोरोनामुळे येणाऱ्या अडचणीमुळे काही पालकांनी मुलांचे शिक्षण थांबविण्याच्या विचारात आहेत.

हे देखील वाचाच - टोमॅटो उत्पादनातून नोकरीवर मात, चार महिण्यात अडीच लाखाचे उत्पन्न

कर्णबधीर विद्यार्थ्यांना सर्वाधिक अडचण
कित्येकवेळा काय शिकवले जाते तेच मुलांना समजत नाही. मुलांना उमजले नाही तर इतर माध्यमातून समजावून सांगतो.  पण सर्वच विद्यार्थ्यांकडे सुविधा असेलच हा प्रश्न आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणाची सर्वात मोठी अडचण आहे. त्यांना दृकश्राव्य माध्यमावर अवलंबून राहावे लागते. दृष्टीहीन विद्यार्थ्यांना समजते, पण सराव करताना अडचणी येतात. अडचणी समजून घेऊन शिक्षण दिले पाहिजे असे दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालकांनी सांगितले. अंशतः दिव्यांग विद्यार्थ्यांपेक्षा पूर्णतः दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांसमोर सर्वाधिक अडचणी आहेत.

येथे क्लिक कराच - नांदेड : अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड नगरला तर विजय कबाडे भोकरला
 
२२ प्रकारचे दिव्यांग, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे
दिव्यांग विद्यार्थ्यांची २२ गटात विभागणी केली जाते. यामध्ये अंशतः किंवा पूर्ण अंध, कर्णबधीर, भाषा व वाचा दोष, बहुविकलांग, अस्थिव्यंग, मानसिक आजार, स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी, अध्ययन अक्षमता, कुष्ठरोग निवारीत, शारीरीक वाढ खुंटणे, बौद्धिक आक्षम, स्नायूची विकृती, थलेसिमिनीया, हेमोफिलीया, पार्किनन्स विकार, अॅसिड अटॅक आदींचा समावेश असून त्यांच्या दिव्यांगानुसार त्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Challenge For The Education Of Divyang Nanded News