मुखेडच्या चांडोळा सज्जाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

तीस हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

नांदेड : वडिलाच्या मृत्यूनंतर शेतजमिनीचा वारसाहक्क लावून फेरफारसाठी तीस हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यावेळी लाचखोर तलाठ्याच्या एका कामगारालाही अटक केली. ही कारवाई शनिवारी (ता. एक) दुपारी नांदेड शहरात केली. 

मुखेड तालुक्यातील एका तक्रारदाराचे वडिल मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नावे असलेली शेती वारसाहक्काने मयता मुलांना व मुलीं नावे करुन घ्यावे लागते. त्यासाठी तक्रारदार चांडोळा (ता. मुखेड) सज्जाचे तलाठी उदयकुमार लक्ष्मणराव मिसाळे (वय ४७) याच्या कार्यालयात गेला. तक्रारदाराने आपल्या कामाचे स्वरुप तलाठी मिसाळे यांना सांगितले. या कामासाठी (वारसाहक्क व फेरफार) ४० हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडअंती ही लाच ३० हजार रुपये देण्याचे ठरले. 

हेही वाचा -  कोरोनात प्रशासनाला मिळत आहे ‘या’ वाहनाची साध...कोणत्या ते वाचा

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

मात्र ही लाच देण्याची इच्छा नसलेला तक्रारदार हा नांदेडला येऊन त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिलेल्या तक्रारीवरुन या विभागाने मागणी पडताळणी सापळा लावला. ता. एक आॅगस्ट रोजी दुपारी तलाठी उदयकुमार मिसाळे याने आपल्या घरी काम करणाऱ्या राहूल प्रल्हाद परांडे याच्या मार्फत तीस हजार रुपये स्विकारले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी उदयकुमार व त्याचा कामगार राहूल परांडे यांना अटक केली. हा सापळा तलाठी यांच्या सावित्रीबाई फुलेनगर कॅनाल रोड नांदेड येथे लावला होता. पोलिस निरीक्षक राहूल पखाले यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यांनी घेतले परिश्रम

हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजयकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहूल पखाले आणि त्यांचे सहकारी बालाजी तेलंग, गणेश तालकोकुलवार, सचीन गायकवाड, अंकुश गाडेकर, मारोती सोनटक्के यांनी परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandola decoration of Mukhed in the trap of Talathi ACB nanded news